Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Konkan › गावगुंडाना अद्दल घडविणारे वादळ अखेर विसावले

गावगुंडाना अद्दल घडविणारे वादळ अखेर विसावले..

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 10:55PM

बुकमार्क करा
कासार्डे : दत्तात्रय मारकड 

आयबहिणींच्या अब्रुवर हात टाकणार्‍या आणि गोरगरिबांवर जुलूम करणार्‍याना गावगुंडाना  जन्माची अद्दल घडविणारे बापू बिरू हे वादळ मंगळवारी काळाच्या उदरात विसावले. अन्याय अणि अत्याचार करणार्‍यांचे हात कलम करत बापू पंचवीस वर्षे रानोमाळात भूमिगत होते. 

सांगली-सातार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’प्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरू वाटेगावकर यांनी इस्लामपुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.बापू बिरू वाटेगावकर अर्थात आप्पा यांचं वाळवा तालुक्यातील बोरगाव हे गाव. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ते परिचित होते.गेल्या काही वर्षांपासून त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर मावळातील सोमटणे फाटा इथल्या पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.वय झालं की सहसा शस्त्रक्रिया केली जात नाही. मात्र, भारदस्त बांधा, बलदंड शरीर आणि दांडगी ताकद असल्याने, आप्पांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती.

आप्पा आणि...कृष्णाकाठीचा रक्‍तरंजित इतिहास.... 
काही दशकापूर्वी गावगुंडांची मुजोरी मोडून काढून, बापू बिरू वाटेगावकर यांनी सांगली परिसरात रक्‍तरंजित इतिहास रचला. गोरगरिबांवर अन्याय करणार्‍यांची खांडोळी करुन, गरिबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला. अनेकांची त्यांनी हत्या केली.अनेक वर्षे  पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, माळरानावर, ऊसाच्या शेतात, डोंगर दर्‍यात राहून बापूंनी अनेक दशके पोलिसांना चकवा दिला.गावातला नामांकित पैलवान म्हणून नावारुपास आलेल्या आप्पाचे हात कधी रक्‍ताने माखले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही.

आप्पा जवळपास 25 वर्षे भूमिगत असल्याचं सांगितले जाते. एकेदिवशी त्यांना पोलिसांनी पकडलंच.बापू बिरू वाटेगावकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी समाजप्रबोधनाचं काम केलं.बापू बिरुंचं प्रवचन ऐकण्यासाठी गावोगावी मोठी गर्दी होत  असे.  गरिबांवर अन्याय करु नका, परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नका,डोक्यात राग  घालून कोणताही निर्णय घेऊ नका.ही त्यांची प्रमुख शिकवण होती. आपल्या करारी बाण्याने पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यात परिचित असलेल्या बापूंनी अखेरपर्यंत समाज प्रबोधनाचे कार्य केले.