Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Konkan › लग्‍नपत्रिका देण्यासाठी जाणारा नवरा मुलगा अपघातात ठार

लग्‍नपत्रिका देण्यासाठी जाणारा नवरा मुलगा अपघातात ठार

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:10PM

बुकमार्क करा

बांदा : वार्ताहर

 स्वतःच्या लग्‍नाच्या पत्रिका वाटण्यासाठी कुडासे येथे जाताना  दुचाकी आणि बोलेरो यांच्यात झालेल्या अपघातात किरण रविकांत सावंत (32, रा. खालची आळी, माजगाव, ता. सावंतवाडी) हा नवरा मुलगाच जागीच ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी सकाळी 9.30 वा.च्या सुमारास डेगवे येथे घडली. तर दुचाकीच्या मागे बसलेला अनिकेत सावंत (17) हा जखमी झाला. अवघ्या पाच दिवसांनी असलेल्या स्वतःच्या लग्‍नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या किरणचा  अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने माजगाव परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.
 सकाळी किरण अनिकेतसह दुचाकीने (जीए 11 एलओ 435) कुडासे येथे जाण्यास निघाला होता.डेगवे येथील अवघड वळणावर रामदास सुभाष स्वार यांच्या गाडीची  (एमएच 07 पी 2656) व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेमुळे किरणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर उजवा हातही मोडला होता.अपघाताचा आवाज ऐकताच येथील स्थानिकांनी किरण आणि अनिकेतला रिक्षाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तत्पूर्वीच किरणचा मृत्यू झाला होता. तर अनिकेतच्या पायाला मुकामार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलिस मनीष शिंदे हे सहकार्‍यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला. पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, कॉन्स्टेबल प्रीतम कदम यांनी परिस्थितीची पाहणी केली.दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. माजगाव येथील सर्वांशी हसतखेळत वावरणार्‍या किरणच्या मृत्यूची बातमी समजताच माजगाव येथील नागरिकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच गर्दी केली होती. यावेळी किरणच्या वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून गेला. किरणच्या पश्‍चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे.