होमपेज › Konkan › माफी मागावी लागल्याने पोलिस पडला बेशुद्ध !

माफी मागावी लागल्याने पोलिस पडला बेशुद्ध !

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:16PM

बुकमार्क करा

बांदा:वार्ताहर

काळ्या काचा असलेली पर्यटकांची गाडी तपासणीसाठी बांदा पोलिसांनी इन्सुली लाठीवर थांबविल्याने त्या गाडीतील पुरुष आणि महिलांनी लाठीवरच बस्तान मांडले.सुमारे पाच तास हे नाटक सुरू असताना ही कारवाई ज्या तीन पोलिसांनी केली त्यांना अधिकार्‍यांनी त्या पर्यटकांची दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पोलिस साहाय्यक उपनिरीक्षक जे.डी.सावंत बेशुद्ध पडले.कारवाई नाही केली तरी अधिकार्‍यांची धास्ती आणि केली तर माफी मागावी लागते,  त्यामुळे पोलिसच असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

   मुंबई-गोवा महामार्गावर सर्व वाहनांची पोलिस लाठीवर तपासणी केली जाते. शुक्रवारी याठिकाणी महेश भोई,जे.डी.सावंत आणि पालकर हे वाहनांची तपासणी करीत होते. दुपारी 3 वा.च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकाची आलिशान कार काळ्या काचा असल्याने थांबविण्यात आली.या गाडीत एका संघटनेचा पदाधिकारी असलेल्या पदाधिकार्‍यांने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.पोलिसांनी त्यांला गाडीतून खाली उतरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्या पदाधिकार्‍यांसह गाडीतील महिलाही खाली उतरत पोलिसांशी हुज्जत घालू लागल्या.

  दरम्यान, या तिन्ही पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा घेत त्यांनी तेथेच ठिय्या मांडला.यावेळी त्यांना अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपला हेका सोडला नाही. याबाबत पोलीस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांनीही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्या पदाधिकार्‍यांने तुमच्या कर्मचार्‍यांनी पैसे मागितले,आमच्यावर मारण्यासाठी धावून आले,गाडीतील महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले असे आरोप करीत त्या तिघांना निलंबित करा, अशी मागणी करीत करवाई न केल्यास येथून उठणार नाही, असे सांगितले.  
   दरम्यान, वातावरण हळूहळू तप्त झाल्याने अखेर कळेकर यांनी नमते घेत आपल्याच कर्मचार्‍यांना त्या पदाधिकार्‍यांची दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसताना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्यानेे  पोलिस अचंबित झाले. मात्र वरिष्ठांचा आदेश असल्याने अखेर भोई,सावंत आणि पालकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.

 दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलिस कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांच्या या   भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जे.डी.सावंत यांना मानसिक धक्का बसला.ते एकदम हायपर झालं.त्यांना पोलिस महासंचालक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आलेले पोलीस पदक वर्दीवरून ओढून काढून फेकले आणि केबिनमध्ये जाताच बेशुद्ध पडले.यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांधही फुटला होता.