Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Konkan › बांद्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

बांद्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:07PMबांदा : (प्रतिनिधी)

बांदा कट्टा कॉर्नर परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन फोटो स्टुडिओ फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. गुरुराज  जयराज कणबर्गी यांच्या स्टुडिओतील 1 लाख 65 हजार, तर अजित दळवी यांच्या स्टुडिओतील 71 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला. भरवस्तीतील या धाडसी चोरीमुळे बांदा बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे . बांदा पोलिसांची गस्त कूचकामी ठरल्याने ही चोरी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत बांदा पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

याबाबत बांदा पोलिसांकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, अजित दळवी हे आपला फोटो स्टुडिओ उघडण्यासाठी सकाळी 7.45  च्या सुमारास आले असता त्यांना आपल्या दुकानाचे शटर अर्धवट स्थितीत उघडे असल्याचे दिसले. त्यावरून आपल्या स्टुडिओत चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता 30 हजार रुपयांचा कॅमेरा, 35 हजार रुपयांचा शूटिंग कॅमेरा, 5 हजार रुपयांची पाच मेमरी कार्डे व  रोख 1 हजार 700 रुपये अशा एकूण  71 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.स्टुडियोमधील सामानही चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकले होते .

गुरुराज कणबर्गी हे सकाळी 8.45 च्या सुमारास आपला स्टुडिओ उघडण्यासाठी आले असता त्यांनाही आपल्या दुकानाचे शटर उघडल्याचे निदर्शनास आले. दुकानात जाऊन पडताळणी केली असता 70 हजार रुपयांचा कॅमेरा, 30 हजार रुपयांचा कॅमेरा, 29 हजार रुपयांचा लॅपटॉप, 10 हजार रुपयांचा फ्लॅश गन, 15 हजार रुपयांचे लेन्स, 2 हजार रुपयांची मेमरी कार्ड व रोख 6 हजार असा एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

पोलिसगस्त नावापुरतीच 
बांदा शहर संवेदनशील असूनही पोलिसांची गस्त ही नावापुरतीच असल्याचे या चोरीच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सर्वात सर्वांत मोठी बाजारपेठ बांदा असूनही पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे चोरीची घटना घडल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला. बांदा शहरात गेल्या काही वर्षांत चोरीच्या घटना या वारंवार घडल्या आहेत.चोरीच्या घटनेनंतर काही दिवसांपूर्वीच पोलीस गस्तही सुरू ठेवण्यात येते. मात्र, नंतर या कालावधीत पोलिस प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येते. सोमवार हा बांदा शहराचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने रविवारी रात्री बाहेरगावचे व्यापारी बांदा शहरात व्यापारासाठी रात्रीच येतात. शहरातील फोडलेले फोटो स्टुडिओ हे पहिल्या मजल्यावर असल्याने या धाडसी चोरीबाबत आश्चर्य व्यक्‍त होत आहे चोरटे हे सराईत असल्याने पोलिसांसमोर तपासासाठी आव्हान निर्माण झाले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिस करीत आहेत.