Tue, Apr 23, 2019 09:49होमपेज › Konkan › अनोखी शक्कल; चक्क सागाच्या पानावर मटणाचा वाटा!

अनोखी शक्कल; चक्क सागाच्या पानावर मटणाचा वाटा!

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:47AMसैतवडे : विलास कोळेकर 

प्लास्टिक बंदी आणि सरकारने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे व्यापार्‍यांनी  ‘नो प्लास्टिक प्लीज’ ही भूमिका घ्यायला सुरुवात  केली आहे. बंदीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच सैतवडे परिसरातील मटण विक्रेत्यांनी नामी शक्‍कल लढवली आहे. स्वच्छ धुतलेली सागाची मोठी पाने आणून त्यावर मटणाचा वाटा ठेवून तो वाटा कागदाने बांधून देण्यात येत होता. दुकानदारांनी अगोदरच केलेल्या या सोयीमुळे लोकांची सोय होत होती.पण पुढच्या वेळी डब्बा घेवून या हे सांगायलाही मटण विक्रेते विसरत नव्हते.

प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीचा रविवार दुसरा दिवस. त्यातच रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने तसेच पावसाने उसंत घेतल्याने सैतवडे परिसरात सकाळी लोकांची गर्दी खरेदीसाठी दुकानात होऊ लागली. दुकानात  खरेदी  करताना प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशव्या दुकानदार देवू लागले आहेत. अनेकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशव्या घेवूनच बाहेर पडणे पसंत केले. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मटण खरेदीसाठी गर्दी होतीच. काहींनी स्टीलचे डबे आणले होते तर काहीजण नेहमीच्या सवयीप्रमाणे रिकाम्या हाताने आले होते. पण गिर्‍हाईक  परत जाऊ नयेत म्हणून मटण विक्रेत्यांनी त्यावर नामी शक्कल लढवली. स्वच्छ धुतलेली सागाची मोठी पाने आणून त्यावर मटणाचा वाटा ठेवून तो वाटा कागदाने बांधून देण्यात येत होता. दुकानदारांनी अगोदरच केलेल्या या सोयीमुळे ग्राहकांची सोय होत होती.

याचबरोबर प्लास्टिक बंदीची सवय नसलेल्या एका युवतीने दुकानात काही किरकोळ वस्तुंची खरेदी केली व प्लास्टिक पिशवी मिळत नसल्याचे लक्षात येताच चक्क ओढणीमध्ये ते साहित्य घेतले. प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे कापडी पिशव्यांची मागणी वाढली आहे तर अजूनही किरकोळ  प्रमाणात ग्रामीण परिसरातील लोक जुन्या प्लास्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहेत. कापडी  पिशवीला भविष्यात ‘अच्छे दिन’ येतील आणि प्लास्टिक पिशव्या इतिहासजमा होतील हे निश्‍चित. पावसाचे दिवस असल्याने पावसापासून विषेशतः मोबाईल, कागदपत्रे व पैसे भिजण्यापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक पिशवीचा आधार अनेकांना अजूही नाईलाजाने घ्यावा लागत आहे.