Tue, Apr 23, 2019 18:25होमपेज › Konkan › पत्रकारांनी बदलत्या काळानुसार ‘अपडेट’ राहावे 

पत्रकारांनी बदलत्या काळानुसार ‘अपडेट’ राहावे 

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:30PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

आजच्या सोशल मीडियाच्या  युगातही वृत्तपत्रांचे समाजातील स्थान  अबाधित आहे, ते  वृत्तपत्रांनी टिकविलेल्या विश्‍वासार्हतेमुळे.  ही विश्‍वासार्हता जपतानाच पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नवनव्या तांत्रिक बदलाची माहिती आत्मसाथ करून अपडेट राहणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ सुदृढ असेल तर खर्‍या अर्थाने लोकशाही अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, संपादक मनोहर कालकुद्रीकर, बेळगाव मराठी पत्रकार परिषदेचे सचिव प्रकाश माने, मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.  या कार्यक्रमात दै. पुढारीचे कणकवलीतील मुख्य प्रतिनिधी अजित मनोहर सावंत यांना जिल्हाधिकारी उदय चौधरी व जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर जिल्हा मुख्यालयातील पत्रकार देवयानी वरसकर यांना  वरिष्ठ पत्रकार, महेश सरनाईक यांना शोध पत्रकारिता पुरस्कार तसेच संतोष सावंत यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तुकाराम नाईक व मोहन जाधव या ज्येष्ठ पत्रकारांचाही विशेष गौरव करण्यात आला. जलयुक्‍त शिवार योजनेतील पत्रकार पुरस्कार विजेते विनोद दळवी, विकास गांवकर,भगवान लोके यांनाही गौरविण्यात आले.  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे वितरण सर्व तालुकाध्यक्षांना करण्यात आले. 

जिल्हाधिकारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही विकासाला दिशा देणारी आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या पुण्यभूमीत त्यांच्या नावाचे भव्य राज्यस्तरीय पत्रकार भवन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पत्रकारांनी बातम्या लिहिताना दोन्ही बाजू समजून घेऊन शहानिशा करत ती बातमी लिहिणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या विधायक टीकेची दखल आम्ही प्रशासन म्हणून निश्‍चितपणे घेत असतो. वृत्तपत्रांवर आजही समाजव्यवस्थेचा तितकाच विश्‍वास आहे. हाच विश्‍वास अधिकाधिक दृढ करत लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांनी बळकट करावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. 

पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी ‘सायबर गुन्हे आणि सोशल मिडिया’ याविषयावर  मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सतर्क असणे आवश्यक आहे. आक्षेपार्ह फोटो किंवा मजकूर याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. अशातून समाजकंटक समाजाला भडकविण्याचे काम करत असतात. सायबरचा गैरवापर केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. कोणत्या मीडियातून कोणी माहिती अपलोड केली हे आता आधुनिक तंत्रज्ञानातून सहज समजू शकते. पत्रकारांनीही आपल्याकडून येणारी माहिती पुढे फॉरवर्ड करताना काळजीपूर्वक त्याचे विपरित परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. 

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांनी सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रकारांनी आपली विश्‍वासाहर्ता जपली आहे. प्रशासन आणि पत्रकार यांच्यात नेहमीच  संवाद असायला हवा. तरच खर्‍या अर्थाने प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्‍त केली. जिल्हा माहिती अधिकारी मिलींद बांदिवडेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. कळकुद्रीकर, तुकाराम नाईक, मोहन जाधव, पुरस्कारप्राप्त पत्रकार अजित सावंत, देवयानी वरसकर, संतोष सावंत, महेश सरनाईक आदींनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी पत्रकार भवनाच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करत पत्रकार संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे यांनी केले. आभार बाळा खडपकर यांनी मानले.