होमपेज › Konkan › पूर्वापार पाऊलवाट मोकळी करण्यास कुचराई

पूर्वापार पाऊलवाट मोकळी करण्यास कुचराई

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:19PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे  येथे बागवाडीकडे जाणारी पूर्वापार पाऊलवाट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी सुधीर माने यांच्या घरात जाण्याचा रस्ताच बंद केला आहे. ही वाट पूर्वापार असल्याने यावर माने यांच्यासह अन्य सहा ग्रामस्थांनी न्यायालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा स्तरांवर आवाज उठवला. त्यानंतर सर्वच ठिकाणी माने यांच्यासह अन्य सहाजणांच्या बाजूने निकाल लागला. अगदी ते बंद केलेली पाऊलवाट मोकळी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीसह जयगड पोलिस ठाण्याला देण्यात आले. मात्र, त्यांनी या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत अवमान केला आहे. 

वाट बंद करणारे जितेंद्र जोशी व कुमार जोशी यांच्यावर कारवाई करण्यातही पोलिसांनी हात आखडता घेतला आहे. याच कारणामुळे माने यांना कित्येक वर्षे रत्नागिरी शहरात भाड्याने राहावे लागत आहे. सध्या न्यायदेवतेच्या आदेशाची पायमल्‍ली सरपंचासह ग्रामपंचायत आणि जयगड पोलिसांनी केल्याने लोकशाही व्यवस्थेवर विश्‍वास कसा ठेवायचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तरीही माने यांनी या अन्यायाविरोधात बंड केले असून दि. 15 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. 

स्वत:चे घर असूनही कित्येक वर्षे रत्नागिरी येथे भाडेतत्वावरील खोलीत रहावे लागत आहे. माने यांच्या घरात जाण्यासाठी असलेल्या पूर्वापार पाऊलवाटेवर त्याच्या घराशेजारच्या जितेंद्र जोशी व कुमार जोशी यांनी बांध घालून बंद केली आहे. ही वाट मोकळी करण्याचा प्रयत्न चारवेळा करण्यात आला. गणपतीपुळेच्या तत्कालीन सरपंच रिमा बापट यांनी यावर जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी जितेंद्र जोशी यांनी अवमानकारक शब्द वापरल्याने व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने बापट यांनी याबाबत संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर विद्यमान सरपंच महेश ठावरे यांनी तीनवेळा वाट मोकळी करण्यासंदर्भात नियोजन केले. मात्र जयगड पोलिसांनी सहकार्य न केल्याने आजतागायत ही कारवाई झालेली नाही. दरम्यान, सरपंचांसह जयगड पोलिस ही कारवाई करण्याबाबत एकमेकांकडे सहकार्य होत नसल्याची बोटे दाखवत आहेत. प्रत्यक्षात माने यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर जयगड पोलिसांनी कागदी घोडे नाचविण्यास सुरूवात केली आहे. ग्रामपंचायतीला कारवाई करण्याबाबत दिवस कळविण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीने यावर काहीही न करता थेट आपलाच नवा नियम तयार केला आहे. नवीन पाऊल वाट तयार करण्यास जि.प. स्थायी समितीने लागू केलेला संमत्तीपत्राचा नियम पूर्वापार पाऊलवाटेला लागू केला आहे. याबाबत सरपंचासह ग्रामसेवकही अनभिज्ञ असल्याने साशंकता वाटू लागली आहे. 

ही पाऊलवाट पिंपळपार ते मोरया या मुख्य रस्त्यालगत असलेल्या तलावाजवळून बागवाडीकडे जाते. या पूवार्र्पार पाऊलवाटेचा उल्लेख जितेंद्र जोशी यांच्या खरेदीखतातही आहे. शिवाय ती वाट मोकळी सोडण्याबाबत मूळ जमीन मालकाने खरेदीखतात नोंद घातलेली आहे. हे खरेदीखत दुय्यम निबंधकांच्या समोर विविध पुराव्यानिशी झालेले असते. मात्र, त्याचाही विचार करण्यात आलेला नाही. खरेदीखतानुसार ही पूर्वापार पाऊलवाट मोकळी ठेवण्यावर शिक्‍कामोर्तब केलेले असताना निबंधकांच्या नियमावलीचा भंग करण्यात आलेला आहे. दरम्यान, हे खरेदीखत आणि त्याबाबतचे सर्व स्तरांवरील आदेश सरपंचांसह ग्रामसेवक व जयगड पोलिसांना दाखवूनही त्यांनी न्यायालय, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्या आदेशाचा अवमानच केला आहे. त्यामुळे पुन्हा उपोषणाचे हत्यार माने यांना उपसावे लागले आहे.