Tue, Jul 16, 2019 13:42होमपेज › Konkan › उखडलेल्या महामार्गामुळे प्रवास जिकिरीचा

उखडलेल्या महामार्गामुळे प्रवास जिकिरीचा

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:05PMचिपळूण : प्रमोद पेडणेकर

मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील अंतर्गत रस्तेही उखडून पूर्णत: दुर्दशा उडाली आहे. गणेशोत्सव पंधरा दिवसांवर आला असतानाच चाकरमान्यांचा प्रवासही खड्ड्यांतूनच होणार असे चित्र आहे. खड्डे बुजविण्याच्या राजकीय घोषणा कितीही झाल्या तरी चाकरमानी व कोकणातील प्रवाशांच्या नशिबात खड्ड्यांचा प्रवास तूर्तास तरी थांबेल अशी चिन्हे नाहीत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या दौर्‍यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात व गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांची सातत्याने वर्दळ असते. मात्र, यंदा महामार्ग पूर्णत: उखडला आहे. तीच स्थिती चिपळूण ते कराड महामार्गाची आहे. निमित्त पावसाचे दिले जात असले तरी कोकणात प्रतिवर्षीच खूप पाऊस पडतो. परंतु, दर्जाहीन कामाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. ठेकेदार व देखभालाची जबाबदारी असणारे सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संगनमतानेच रस्त्यांची सातत्याने दुर्दशा कोकणच्या जनतेच्या नशिबी येते, अशीच भावना निर्माण झाली आहे. सागरी महामार्ग गेली काही वर्षे पूर्णत: राजकीयद‍ृष्ट्या दुर्लक्षित राहिला आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती दिली जात असताना सध्याचा महामार्ग मात्र संपूर्णत: उखडला आहे. यामुळे प्रवासातच जनतेचा तासन्तास वेळ वाया जात आहे. वाहनांची दुर्दशा वेगळीच. मुंबईकडे जाणारा प्रवासी वेळ दुप्पट झाला आहे. चिपळूण ते रत्नागिरी वा चिपळूण ते मंडणगड शिवाय चिपळूण ते कराड या सर्वच मार्गांवर पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्‍त भावना आहे. सातत्याने कोकणी जनतेच्या नशिबी खड्ड्यांतूनच प्रवास  होत आहे. त्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी जनतेनेच नाराजी नोंदवली. मात्र, सत्ताधारी शिवसेना, भाजप व विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीवर मात्र कोणीच रस्त्यावर उतरत नसल्याने कोकणी जनतेच्या मनात तीव्र संताप आहे.

गणेशोत्सव पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी व हजारो वाहने यानिमित्त कोकणात येत असतात. त्यांच्या सुखकर प्रवासासाठी राज्य सरकार उदासीन असल्याने सरकारच्या विरोधातही भावना निर्माण झाली आहेत. याची दखल खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्याना घ्यावी लागली. त्यातूनच चंद्रकांत पाटील यांचा केवळ रस्त्यांची दुर्दशा बघण्यासाठीच पाहणी दौरा आज होत आहे.
 या दौर्‍यातून जनतेला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या निमित्ताने महामार्गावरील रखडलेली पुलाची कामे व मंदावलेले महामार्गाच्या कामाला गती येईल. खड्ड्यांचे साम्राज्य हटवून दर्जेदार काम होण्याबाबत बांधकाममंत्री निर्देश देतील असे संकेत मिळत आहेत.