Fri, Apr 26, 2019 20:11होमपेज › Konkan › ‘रनप’चा मालमत्ता विभाग म्हणजे नाव ‘सोनूबाई...’

‘रनप’चा मालमत्ता विभाग म्हणजे नाव ‘सोनूबाई...’

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:28AM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता विभागाची अवस्था  सध्या ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ या म्हणीप्रमाणे आहे. या विभागाची शहरात 100 कोटी रुपयांपेक्षा  अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. वार्षिक सुमारे 1 कोटी रुपयेची कमाई आहे. पण हा मालमत्ता विभाग मोडकळीस आलेल्या जुन्या कौलारू घराच्या पडवीत कार्यरत आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या आवारातील कौलारू घराच्या एका पडवीत मालमत्ता विभागाचे काम चालते. तेथे जेमतेम एका अधिकार्‍याला बसण्यास आणि कामासाठी येाणर्‍या एखाद-दुसर्‍यास उभे राहण्यापुरतीच अरुंद जागा आहे. छपराचे वासे-रिपा तुटून अक्षरश: लोंबकळत आहेत. पूर्वी येथे टेलीफोन कार्यालय आणि त्यापूर्वी विश्रांतीगृह म्हणून त्या घराचा वापर झाला आहे. विशेष म्हणजे याच घराच्या पडवीत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 100 कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या संपत्तीचा हिशेब ठेवला जातोय.

शहरातील मार्केट, मैदाने, शॉपिंग सेंटर, शाळा, व्यायामशाळा, इमारती, नाट्यगृह, उद्याने, गाळे, क्वॉर्टटस्, लघुउद्योग-मत्स्योद्योग वसाहतीतील भूखंड, बेघर वसाहत, जलतरण तलाव, स्टेडियम, दवाखाने, भूईभाड्याने दिलेल्या जागा, जाहिरात बोर्ड अशा अनेक प्रकारच्या मालमत्तांच्या बाबतीतील सर्व कार्यवाही मालमत्ता विभागाकडून होते. वर्षाला सुमारे 75 लाख रुपये वेगवेगळ्या रुपाने भाडे तर सुमारे 25 लाख रुपये मक्त्यातून मिळतात.

मालमत्ता विभाग ज्या ठिकाणी आहे त्याच घराच्या बाजूच्या खोलीत पाणीपट्टी विभाग, पंतप्रधान आवास योजनेचेही कार्यालय आहे. पाणी पट्टीतूनही रत्नागिरी पालिकेस लाखो रुपये मिळतात. रनपच्या प्रशासकीय इमारतीत पुरेशी जागा नसल्याने हे विभाग बाजूच्या घरात कार्यरत आहेत. पण तो इमला दुरूस्त करून घेण्याची आवश्यकता असून पदाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.