Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Konkan › ‘आयुष्यमान’मध्ये श्रीमंतांना स्थान

‘आयुष्यमान’मध्ये श्रीमंतांना स्थान

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:24PMचिपळूण : खास प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांसाठी ‘आयुष्यमान भारत राष्ट्रीय सुरक्षा स्वास्थ्य योजना’ आखली आहे. मात्र, या आयुष्यमान योजनेमध्ये लाभार्थी म्हणून श्रीमंतानाच स्थान मिळाले आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांमधील लोक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या लाभार्थ्यांची यादी गावात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण होऊ लागले आहेत.

आयुष्यमान स्वास्थ्य सुरक्षा योजनेसाठी लाभार्थी म्हणून अनेक ठिकाणी सेवानिवृत्त, पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्य, सरपंच, गावचे पुढारी, दुकानदार, व्यापारी आणि नोकरदार कुटुंबांची नावे या योजनेत समाविष्ट  करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तर दुसर्‍या बाजूला खरे गरजू आणि दुर्बल घटकांतील लोक या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे 84 हजार लाभार्थी आहेत. मात्र, या लाभार्थी यादीबाबत जिल्हाभरातून संशय व्यक्‍त होत आहे. ‘आयुष्यमान’मध्ये श्रीमंतांना स्थान अशा प्रतिक्रिया गावागावात उमटू लागल्या आहेत. 

सन 2011 मध्ये देशात सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय जनगणना करण्यात आली. या गणनेनुसार आयुष्यमान भारत राष्ट्रीय सुरक्षा स्वास्थ्य योजनेचे लाभार्थी शासनानेच लावलेल्या निकषांनी निवडण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यात 86 हजार तर चिपळूण तालुक्यात 16 हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. परंतु, या लाभार्थी यादीवरून गावात तंटा होण्याचा धोका आहे. अनेक धनदांडगे, टोलेजंग घर असणारे या योजनेचे लाभार्थी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांवर अन्याय होत असून गरजू लोक या योजनेपासून वंचित राहणार आहेत. या योजनेबाबत लाभार्थ्यांच्या मुद्यावरून अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे दाखल होत आहेत. दुर्बल घटकातील काही लोक आपले नाव या योजनेत का नाही? असा सवाल आता आरोग्य विभागाकडे करीत आहेत. तसेच काही ग्रामपंचायतींमध्ये हा विषय गाजत आहे. याबाबत येथील पंचायत समितीचे गटनेते राकेश शिंदे यांना विचारले असता स्वास्थ्य योजनेसाठी निवडलेले लाभार्थी चुकीचे आहेत, असे ते म्हणाले. ज्यांना खरी गरज आहे ते या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे दारिद्य्ररेषेखालील लोकांची यादी ग्रामसभेत वाचून मंजूर करण्यात आली. त्याप्रमाणे यादीही ग्रामसभेत निश्‍चित करावी.

अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह
या योजनेमुळे गरजू लोकांना औषधोपचार करता येणार आहे. मात्र, यादीत घोळ असल्याने योजना असून देखील त्याचा लाभ मिळणे मुश्कील होणार आहे. या योजनेची लाभार्थी यादी केंद्र शासनाने निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यादीतील घोळामुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्‍न निर्माण होत आहे.