Sun, Jul 12, 2020 22:40होमपेज › Konkan › जानवळेतील मारहाणीत तिघे जबर जखमी; सात अटकेत

जानवळेतील मारहाणीत तिघे जबर जखमी; सात अटकेत

Published On: Apr 08 2019 1:56AM | Last Updated: Apr 07 2019 10:04PM
शृंगारतळी : वार्ताहर

क्षुल्लक चेष्टा-मस्करी केल्याचा राग मनात धरून तिघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तब्बल 7 जणांना रविवारी गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. मौजे जानवळे येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. 

याबाबतची फिर्याद उत्तम बाळू पवार (मूळ रा. त्र्यंबकेश्‍वर, सध्या रा. जानवळे फाटा) यांनी शनिवारी गुहागर पोलिसांत दिली आहे. दराप्पा शामराव रानगट्टी, विजय भिमू रानगट्टी, हनुमंत शामराव रानगट्टी, शरद महादेव खोत, अमृत पांडरंग येडवे, अशोक प्रभू गगनमले, दशरथ जटाप्पा येडवे (मूळ रा.विजापूर कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उत्तम  पवार हे गणेश ढगेंकडे इलेक्ट्रिक पोल बसविण्याचे व लाईनच्या तारा ओढण्याच्या ठेका पद्धतीवर मजुरीचे काम दीड वर्षापासून  करतात. त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील 21 जण नाशिक येथून शुक्रवारी मौजे शृंगारतळी येथे कामावर आले. हे सर्वजण मौजे जानवळे फाटा येथील पॉवर हाऊसजवळ राहणारे आहेत. यातील फिर्यादी उत्तम पवार हे शुक्रवारी ठेकेदार गणेश ढगेंसोबत शृंगारतळी बाजारपेेठेत कपडे खरेदी करावयास गेले होते. यावेळी पवार यांच्या मोबाईलवर अमोल पवार या कामगाराने फोन करून आपल्या शेजारील कर्नाटकातील मुलांसोबत आपली भांडणे झाली आहेत. तुम्ही ताबडतोब निघून या, असे सांगितले. 

यावेळी उत्तम पवार, गणेश ढगे घटनास्थळी आले. याविषयी दोघांनी कामगारांना विचारले असता त्यांनी, आम्ही लिंबू सरबत पित बसलो असताना राऊत हा आपल्यापैकी दीपक पवारला शिवीगाळ करून चेष्टा मस्करीत बोलत होता. यावेळी राऊत हा आपल्यालाच बोलत असल्याचा गैरसमज होऊन यातील एकाने जमाव करून राऊतला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली, असे सांगितले. त्यामुळे उत्तम पवार, गणेश ढगे व त्यांचे कामगार हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी 7 संशयित आरोपींपैकी दराप्पा रानगट्टीने हातातील चाकूने गणेश ढगेंच्या डाव्या कुशीत भोसकून व त्यानंतर त्याच चाकूने उत्तम पवारचा कामगार सुरेश पवारांच्याही पोटात घुसविला. तसेच डोक्यात लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी अमोल पवारच्याही डोक्यात आरोपी रानगट्टीने लोखंडी पाईपने कपाळावर मारून जखमी केले आहे. 

यातील अन्य 5 संशयित आरोपींनी उत्तम पवार व गणेश ढगे, सुरेश पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील तिघे जखमी एका गाडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी जात असताना वरील 5 आरोपींनी गाडीच्या काचा फोडून व टायरची हवा काढून नुकसान केले. त्यामुळे या जखमींना खासगी गाडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यातील गणेश ढगे व सुरेश पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चिपळूण येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले समजते.