होमपेज › Konkan › कुडाळनगरीत अवतरले ‘प्रतिपंढरपूर’

कुडाळनगरीत अवतरले ‘प्रतिपंढरपूर’

Published On: Jul 23 2018 10:56PM | Last Updated: Jul 23 2018 10:56PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारूती मंदिरात सोमवारी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रखुमाई देखावा साकारण्यात आल्याने साक्षात प्रतिपंढरपूर अवतरले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बाजारपेठेतून भाविक भक्‍तांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली श्री विठ्ठल रखुमाई देखाव्याची मिरवणूक लक्षवेधी ठरली. मंगळवार 24 रोजी सकाळी दहिकाल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे. 

बाजारपेठ येथील श्री देव मारूती मंदिरात गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह भक्‍तिमय वातावरणात सुरू आहे. मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईचा देखावा साकारण्यात आला. सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात धार्मिक कार्यक्रमांसह ग्रामस्थांची भजने सादर झाली. यात संगीत सदगुरू भजन मंडळ (कुडाळ), श्री देव भोम भजन मंडळ (आंदुर्ले), मोबारेश्‍वर वारकरी भजन मंडळ (देवबाग), रामेश्‍वर वारकरी भजन मंडळ (आचरा) यांच्या भजनांसह महादेश्‍वर प्रा.ढोलपथक (नाडण) यांच्या ढोलपथकाचे सादरीकरण झाले. 

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या सातव्या दिवसाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मंदार शिरसाट, भाऊ शिरसाट, अभय शिरसाट, गजानन कांदळगांवकर, प्रसाद नाईक आदींसह परीक्षक व भाविक-भक्‍त उपस्थित होते.  सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

सायंकाळी बाजारपेठेतून श्री विठ्ठल रखुमाई देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मंदार शिरसाट, अभय शिरसाट, राजेश म्हाडेश्‍वर, दीपक भोगटे आदींसह देवस्थान कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सप्ताहाची सातवी रात्र गांधीचौक मित्रमंडळ, कुडाळने उत्साहात साजरी केली. गोवर्धन प्रा.भजन मंडळ वेंगुर्ले वडखोल, ओमसाई प्रा.भजन कुडाळ, श्री देव भोम प्रा.भजन मंडळ आंदुर्ले, स्वरधारा प्रा.भजन मंडळ,तांबोळी यांची स्पर्धेतील भजने सादर झाली. रात्री जिल्हास्तरीय चित्ररथ दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.