Tue, Mar 26, 2019 23:58होमपेज › Konkan › ‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना!

‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना!

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PMआसगे : प्रकाश हर्चेकर

विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून स्वयंरोजगार करता यावा, यासाठी शासनातर्फे तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊन सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या. त्याद्वारे मूलभूत सोयीसुविधा देण्यात आल्या. परंतु, काही ठिकाणी साधनसामुग्री व यंत्रसामुग्री यांची पूर्तता करण्यात आली नाही. सुरुवातीला सुरु असलेले ट्रेडच पुढे चालू ठेवण्यात आले. ट्रेडचा फेरआढावा घेऊन व सर्वेक्षण करून स्थानिकांची गरज व मागणीनुसार नव्याने अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षांत अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.

सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. राज्यभरात शासकीय व खासगी दोन्ही मिळून सुमारे 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध आहेत. 
या अभ्यासक्रमांना  आवश्यकतेपेक्षा अधिक हजारो विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक दिसतात. तालुकास्तरावर कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना पसंती मिळत असताना दहा ते पंधरा वर्षांपासून सुरु असलेल्या ट्रेडमध्ये वाढ करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अधिकचे पर्याय उपलब्ध नसल्याने आहेत तेच पर्याय ना इलाजास्तव स्वीकारावे लागत आहेत.

इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर नवीन ट्रेड चालू केले नसल्याने कुचकामी ठरत आहे. शासनाने एका बाजूला विद्यार्थ्यांना उच्च अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परवानगी देऊन औद्योगिक शिक्षणाकडे ओढा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसर्‍या बाजूला सुयोग्य प्रसिद्धी व नव नवीन ट्रेड सुरु करण्यात उदासीनता दाखवत समाजात संभ्रमावस्था निर्माण केली आहे.