Sat, Dec 14, 2019 02:52होमपेज › Konkan › ‘अरुणा’ धरणग्रस्तांनी सोडले गाव!

‘अरुणा’ धरणग्रस्तांनी सोडले गाव!

Published On: Jul 09 2019 1:16AM | Last Updated: Jul 08 2019 11:03PM
वैभववाडी ः प्रतिनिधी

गेले आठ दिवस पडणार्‍या जोरदार पावसाने अरुणा धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी भोम गावाच्या गावठाण भागात पाणी  घुसले. त्यामुळे गावात असलेल्या धरणग्रस्तांना प्रशासनाने विनंती केल्यानंतर अखेर धरणग्रस्त गावाबाहेर पडले आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

अरुणा प्रकल्प परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने धरणात दिवसेंदिवस पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी संपूर्ण भोम गावाला पाण्याने पूर्ण वेढा दिला. बहुतांश गावठाण भाग पाण्याखाली गेला आहे. भोम गावची प्राथमिक शाळा, गावचे ग्रामदैवत श्री गांगोदेवाचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले. तरीही भोम येथील काही प्रकल्पग्रस्त गावातच ठाण मांडून होते. जोपर्यंत नागरी सुविधांसह पुनर्वसन होत नाही, भूखंड वाटप, मोबदला वाटप होत नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. पाणी अगदी घराभोवती आले तरी ते घर सोडण्यास तयार नव्हते. सोमवारी सकाळी पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. गावातील या कुटुंबांना समजावून बाहेर काढण्यासाठी कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसीलदार रामदास झळके, पो.नि.दत्तात्रय बाकारे व कर्मचारी मौदे-गुरववाडी मार्गे भोम येथे पोहचले. त्यांनी गावात थांबलेल्या धरणग्रस्तांना वस्तुस्थिती सांगत बाहेर पडण्याची विनंती केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आम्ही जायचे कुठे ? राहायचे कुठे? भूखंड नाही, मोबदला नाही. मयत खातेदारांच्या वारसांना नोटीस द्या, भूखंड द्या, पुनर्वसनात नागरी सुविधा द्या तसेच धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी, अशा अनेक मागण्या केल्या. आपल्या मागण्याबाबत मंगळवारी प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. तसेच गाव सोडण्याची विनंती केली. अखेर नाईलाजास्तव धरणग्रस्तांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि गेले महिनाभर सुरू असलेला प्रशासनासमोरील पेच सुटला आहे.

..आणि महिन्याच्या वासराला दिले जीवदान

धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे रामचंद्र सूर्यवंशी यांची गाय व एक महिन्याचे वासरू पाण्यात अडकून पडले होते. भोम येथील विलास कदम, बाळा बांद्रे, श्रीकांत बांद्रे यांनी आपल्या अन्य सहकार्‍यांच्या सहकार्याने या वासराला व गायीला पाण्याबाहेर सुखरूप काढले.