Fri, May 24, 2019 08:36होमपेज › Konkan › विकासाला विरोध करणार्‍यांना जनताच घरी बसवणार 

विकासाला विरोध करणार्‍यांना जनताच घरी बसवणार 

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 9:11PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारणार आहे. विकासाला विरोध करणार्‍यांना जनताच घरी बसवणार असून त्यांनी फक्‍त चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचेच काम करावे, असा खोचक सल्‍ला राज्याचे बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे नाव न घेता येथे दिला.

आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या देवरूख दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या दौर्‍यातील पहिली सभा तालुका संपर्क कार्यालयात झाली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत विधानपरिषदचे आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, महिला जिल्हाध्यक्ष रश्मी कदम, नगराध्यक्ष निलेश भुरवणे, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

ना. चव्हाण यांनी शिवसेनेवर हल्‍लाबोल करीत, कोणत्याही गोष्टीला विरोध केला की विकास होत नाही, विरोध करणारे कोकण विकासाच्या गप्पा मारतात. मात्र, गेल्या चार वर्षांत तुम्ही कोकणसाठी काय केलेत हे जाहीर करावे, कोकणात जे काही आले आहे ते केवळ भाजपमुळे आले असून मतदारांना हे सर्व ज्ञात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी विकासकामे झाली आहेत, होणार आहेत त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, आपल्या सरकारने केवळ बोलून न दाखवता करून दाखवले आहे. अजून एक वर्षात बराच काही बदल होणार आहे. देवरूखची निवडणूक आपण स्वबळावर लढवणार आहोत. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याची वाट न पाहता सर्वांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

आ. प्रसाद लाड यांनी, राज्यात भाजपच्या माध्यमातूनच विकासाची गंगा आली आहे. विरोधकांचा हल्‍लाबोल निष्क्रिय ठरत आहे. आगामी निवडणुकीतही देशासह राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी देवरूखचे आव्हान फारसे कठीण नसले तरी आपण जागृत राहिले पाहिजे. येथे नगराध्यक्षासह सर्वात जास्त उमेदवार भाजपचेच विजयी होतील. त्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आतापासून कामाला लागणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांकडून स्थानिक निवडणूक तयारीचा आढावा घेतला. वॉर्डातील प्रत्येक घरात ‘कमळ’ पोचवण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. सभेला शहर कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.