Wed, May 22, 2019 07:24होमपेज › Konkan › ‘आपले सरकार’चे पैसे पुन्हा ग्रामपंचायतींकडे

‘आपले सरकार’चे पैसे पुन्हा ग्रामपंचायतींकडे

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 845 पैकी 523 ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु आहे. हे केंद्र चालवणार्‍या कंपनीला ग्रामपंचायतींनी तीन महिन्यांची रक्कम आगाऊ द्यायची, असा शासन निर्णय झाला होता. त्यानुसार ग्रामपंचायती रक्कमही भरत आहेत. परंतु, या कंपनीकडून सुविधा पुरवण्यात येत नसल्याने आमदार उदय सामंत यांनी हल्लाबोल केला होता. त्यामुळे आगाऊ भरलेले पैसे ग्रामपंचायतींकडे पुन्हा वर्ग करण्यात आले असून साडेचारशे ग्रामपंचायतींना याचा लाभ मिळणार आहे. 

आपले सरकार केंद्र चालवणार्‍या कंपनीत आगाऊ रक्कम जमा करण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर बँक खाते काढण्यात आले होते. ग्रामपंचायतींकडून जमा केलेली रक्कम त्या खात्यात भरावयाची होती. मात्र, ग्रामपंचायतींनी याला विरोध दर्शविला. 

केंद्रावरील कर्मचार्‍यांना नियमित पगार दिला जात नव्हता, संगणक व प्रिंटर बंद पडत होते. त्याला पूरक साहित्य कंपनीकडून दिले जात नव्हते. एकीकडे सुविधा दिल्या जात नव्हत्या, दुसरीकडे पैसे आगाऊ घेण्यात येत होते. याला रत्नागिरीतील सरपंचांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार सामंत यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागावर हल्लाबोल केला होता.

आमदार उदय सामंत यांनी धारण केलेल्या आक्रमकपणानंतर काही दिवसांत केंद्रचालकांना रितसर पगार मिळू लागला आहे. मार्च महिन्यासाठी आगाऊ भरलेली रक्कम आठ दिवसांत ग्रामपंचायत विभागाने त्या-त्या ग्रामपंचायतींकडे वर्ग केली आहे. ज्या केंद्रांवरील संगणक, प्रिंटर बंद पडले आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी कंपनीकडूनही कर्मचारी पाठविण्यात आला आहे. शंभर नवे प्रिंटर आणि 25 नवे संगणक ग्रामपंचायतीत बसविण्यात आले आहेत. 
जिल्हा परिषदेवरील हल्लाबोलनंतर जिल्हास्तरावरील समन्वयकाने राजीनामा सादर केला. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रकल्प समन्वयक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांच्यामार्फत प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले.