Sat, Jul 20, 2019 11:02होमपेज › Konkan › अनन्या जहाज फ्लोटिंग डॉकवर स्थिरावले

अनन्या जहाज फ्लोटिंग डॉकवर स्थिरावले

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 8:39PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

देशातील सर्वसाधारण जहाजांपेक्षा वेगळ्या धाटणीचे ‘टग अनन्या’ हे जहाज जयगड खाडीतील काताळे टर्मिनलच्या ‘फ्लोटिंग डॉक’वर यशस्वीरित्या चढविण्यात आले. कोकणातील बंदरात प्रथमच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे. मरिनर दिलीप भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी हे काम यशस्वी केले आहे. 

मे.हाँगर आफशोअर व मरीनर प्रा.लि. या कंपनीच्या मालकीचे ‘टग अनन्या’ हे जहाज वेगळया धाटणीचे आहे. सर्वसाधारण जहाजांचा पंखा हा जहाजाच्या मागच्या बाजूला किंवा तळाच्या थोड्या वरच्या बाजूला बसविला असतो. ‘अनन्या’चे वेगळे वैशिष्ट्य आहे. या जहाजाला दोन पंखे असून, ते जहाजाच्या तळाखाली सुमारे 1 मीटर अंतरावर बसविण्यात आले आहेत. सर्वसाधारण जहाजांसाठी फ्लोटिंग डॉक पाच ते सहा मीटर पाण्यात बुडवावे लागते. परंतु, ‘अनन्या’साठी साडेआठ मीटर खोल पाण्यात डॉक बुडवावे लागते. 

डॉकच्या 26 टाक्या विशिष्ट क्रमवारीने समुद्राच्या पाण्याने भरण्यात आल्या. ‘अनन्या’ जहाज वेगळ्या धाटणीचे असल्याने जहाज डॉकवर स्थिरवताना पंख्याशेजारी असलेल्या जहाजाच्या तळाखाली पाम स्टँड आणि मागच्या भागातील स्केग हे डॉकवर ठेवलेल्या किल ब्लाक्सवर व्यवस्थित बसल्याची खात्री करण्यासाठी स्कुबा डायव्हर पाठविण्यात आला होता. खात्री, झाल्यानंतर जहाजासह डॉक पाण्यावर उचलण्यात आले. साडेआठ मीटर खोल पाण्यात बुडालेले डाक जहाजाला घेऊन पाण्याबाहेर उचलल्यानंतर केवण दीड मीटर ड्राफ्टवर स्थिर करण्यात आले आहे. 

मरिनर दिलीप भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मरिन सिंडिकेटचे तंत्रज्ञ इंद्रनिल भाटकर, शेखर शिंदे, विजय मांडवकर, महेंद्र पाटील, संतोष बारस्कर, रामदास पंडित व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले. अनुभवी डॉक मास्टर विल्यम मोर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सैतवडे येथील कल्पेश तावडे, या मुलाने छोट्या बोटीने जहाजाचे दोरखंड सांभाळण्याचे काम केले. तर काताळ शिपयार्डचे दिलीप बाईंग, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. उगलमोगले यांनी टीमचे कौतुक केले.