Sat, Dec 14, 2019 03:25होमपेज › Konkan › सुवर्ण कोकण : काय चुकलं, काय बरोबर?

सुवर्ण कोकण : काय चुकलं, काय बरोबर?

Published On: May 25 2019 2:09AM | Last Updated: May 24 2019 11:53PM
गणेश जेठे

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर कुणाचं काय चुकलं आणि कुणाचं काय बरोबर? याची चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी तर आपल्या दै.प्रहारमध्ये विशेष संपादकीय लिहून आपले मन आणि भावना व्यक्‍त केल्या आहेत. आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली आहे. लेखातही त्यांनी “गेल्या 30 वर्षात आपले काही चुकले असेल तर जरूर नजरेला आणा” असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत  नीलेश राणे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याचेही म्हटले आहे. त्यावेळी मोठा विजय मिळविलेले खा.विनायक राऊत आणि शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी आपले कसे बरोबर होते आणि आपली भुमिका कशी बरोबर आहे, हे स्पष्ट करण्यास सुरूवात केली आहे.  निवडणुकांमधील जय- पराजयानंतर अशी चर्चा होणे स्वाभाविकच आहे. परंतु खा. नारायण राणे एखाद्या निवडणूक निकालानंतर असे खुलेपणाने तपशीलात जावून पहिल्यांदाच व्यक्‍त झाले आहेत. आमचा पराभव का? असा सवाल त्यांनी केला आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच राणे यांनी आपल्या भावना अशा विस्तृतपणे व्यक्‍त केल्यानंतर त्यासंदर्भातील जोरदार चर्चा लोकांमध्येही सुरू झाली आहे.

कोकण म्हणजे दादा...नारायण राणे हे राजकारणातील समीकरण दोन-अडीच दशके कायम राहीले. आता ते तसे समीकरण राहिलेले नाही. राणे यांचा कोकणच्या राजकारणातील प्रभाव ओसरला आहे. खरे तर या निकालानंतर राजकीय पातळीवर तशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातून अनेक मुद्दे पुढे येत आहेत. राणे यांचा स्वत:चा स्वतंत्र पक्ष आणि त्याला असणार्‍या मर्यादा हा एक मुद्दा महत्वाचा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाची आणि सत्ताकारणाची आता माहिती असलेल्या लोकांनी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने विचार करताना हा मुद्दा महत्वाचा मानला असावा. कोणत्याही छोट्या पक्षापेक्षा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील मोठ्या पक्षातून लोकसभेच्या निवडणुका लढणे कधीही सोपे असते. त्याशिवाय नुसत्या राजकारणापेक्षा सत्ताकारणाकडे आकर्षित होण्याचा कल आता सर्व पातळीवर वाढला आहे. राणे यांनी आपण भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असल्याचे जाहीर केले होते.  परंतु भाजप-शिवसेना युती होवून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेला दिल्याने राणे यांचा पक्ष या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नाही, असाच ‘मेसेज’ लोकांपर्यंत गेला. त्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी बसविण्याचा विचार करताना लोकांनी राऊत यांचा विचार केला हे आता स्पष्ट झाले आहे.

हो..हे खरे आहे की राणे यांच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क भक्‍कम आहे. पण ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत नेटवर्क आहे. निवडणुकीतील मतदानानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कल विचारण्यासाठी तेथील वरिष्ठ पत्रकार राजेश मयेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले होते, ‘रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळेल. येथील शिवसैनिक कट्टर आहे, तो गद्दारी करत नाही.’ मयेकर यांनी म्हटल्याप्रमाणे तेथील शिवसैनिकांनी ते दाखवून दिले. राऊत यांना फार मोठे मताधिक्य दिले. जसा रत्नागिरीतील शिवसैनिक तसाच सिंधुदुर्गातील राणे समर्थक निष्ठावंत आहे. राणे शिवसेनेत असताना त्यांचे कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक होते. आता ते कट्टर राणे समर्थक आहेत. एवढ्या मोठ्या मोदी लाटेतही हे राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तग धरून राहीले. हलले नाहीत. म्हणून तर शिवसेनेला आणखी मिळू शकणारे लीड रोखले गेले. पण हेही खरे आहे राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळणार्‍या मताधिक्यावर रत्नागिरी जिल्ह्यात होणारे नुकसान भरून काढू असे स्वाभिमान पक्षाला वाटले होते. परंतु तसे घडले नाही. कारण सध्या सिंधुदुर्गात अस्तित्वात असलेल्या राणे यांच्या भक्‍कम नेटवर्कने प्रामाणिकपणे काम केले असले तरी त्या नेटवर्कची व्याप्तीच कमी झाली आहे. राणे यांच्या सोबत अनेक वर्षे काम करणारे संजय पडते, काका कुडाळकर, राजन तेली हे आणि असे अनेक खंदे समर्थक राणे यांना सोडून गेले आहेत. अनेकजण या संघटन प्रवाहापासून दूरच आहेत. अनेकजण राणे यांच्या नेटवर्कला नव्याने जोडले गेले, परंतु सोडून गेलेल्यांची उणीव पूर्णपणे भरून काढू शकले नाहीत. त्या उलट राणे यांनी शिवसेनेला सोडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडकळीस निघालेली शिवसेना संघटना खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर या त्रयींनी पुन्हा बांधण्यास सुरूवात केली. त्यात त्यांना बर्‍यापैकी यशही आले. शिवसेनेचे हे नेटवर्क सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळूहळू आकाराला येते आहे. त्याचाच परिणाम या निवडणुकीत दिसला. स्वत: खा. नारायण राणे आणि आ. नीतेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत, अशोक सावंत, संजू परब, रणजीत देसाई यांनी जिल्हाभरात प्रचंड मेहनत घेवूनही शिवसेनेला जिल्ह्यात जे 26 हजाराचे मताधिक्य मिळाले हे त्यामुळेच.

‘कार्यकर्त्यांमधील नाराजी’ हा फॅक्टर सर्वव्यापी आहे. हा फॅक्टर सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतोच. तसा तो राणे यांच्या संघटनमध्येही आहेच. फक्‍त एकच, राणे यांच्या संघटनमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी कधी उघडपणे व्यक्‍त होत नाही. ती सुप्त स्वरूपाची असते. ही नाराजी दबली जाते, पण नष्ट होत नाही. त्याचा इफेक्ट अशा निवडणुकांमध्ये होतो. अर्थात राणे यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांमधील नाराजी असली तर ती का आहे? हा मोठा चर्चेचा आणि स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पूर्वीसारखे कार्यकर्ते आता राहीले नाहीत. नुसता वडापाव खाऊन निष्ठा बाळगणारे कार्यकर्ते आता खुपच कमी झाले आहेत. अर्थात तसे राहणे आताच्या जमान्यात शक्य नाही. कारण प्रत्येकालाच उंची जीवन जगायचे आहे. त्यासाठी आर्थिक समृध्दी हवी. राजकारणातही पक्ष संघटनेत काम करताना पैसा देणारा मार्ग हवा. राजकीय स्थैर्य हवे. सिंधुदुर्गात सहकार चळवळीतील लाभाची पदे कमीच आहेत. ती आहेत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये. पण तीही ‘वर्ष-सव्वा वर्षासाठी. अडीच वर्षांसाठी.  प्रत्येकाला संधी, हे धोरण ठीक आहे, पण संधी मिळालेला प्रत्येकजण संघटक, प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ता असतोच असे नाही. त्यामुळे पदावरून उतरले की दिसेनासे होणारे अनेकजण आहेत. त्यातुनच निष्ठेचे फळ मिळेल याची शाश्‍वती उरत नाही. आशा, आकांक्षा, महत्वकांक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला आहेत. त्या पूर्ण नाही झाल्या की मग नाराजी आलीच. सत्ता नसली की मग ही नाराजी आणखी फोफावते. अशा नाराजीचा त्रास राणे यांच्या नेटवर्कलाही होतो.

राणे यांचे राजकारणात नेहमीच वर्चस्व राहीले. कुठल्याही यशस्वी नेत्याची नकारात्मक वस्तुस्थिती ऐकण्याची इच्छा नसते. स्वाभाविकपणे राणे यांनाही कधी नकारात्मक वस्तुस्थिती ऐकणे रूचत नसावे. एखाद्याने अशी ‘निगेटीव्ह फॅक्ट’ समोर आणली तर त्यांना आवडत नाही, अशी समज कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते ‘दादा चिडीतील’ अशी भीती बाळगून गप्प बसतात. वस्तुस्थिती सांगत नाहीत. त्यातही मग काहीजण उगाचच रंगवून काही तरी पॉझिटीव्ह सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून वस्तुस्थिती बाजूला पडते. 

सोशल मिडियाच्या वाढत्या पसार्‍यामुळे निवडणूक काळात उमेदवाराची कोणतीही मूव्हमेंट लगेचच व्हायरल होते. सावंतवाडीत एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत नीलेश राणे यांनी खा.विनायक राऊत यांचा एकेरी शब्दात केलेला उल्लेख आणि त्याची व्हिडीओ क्लीप वेगाने व्हायरल झाली होती. त्याचा निगेटीव्ह इफेक्ट झाल्याचीही आता चर्चा आहे. पराभव झाला की अशी एका ना अनेक कारणे पुढे चर्चेला येतात. ती किती सिरीअस घ्यायची हे शेवटी ज्या त्या पक्षावर अवलंबून आहे. यापुढे निवडणुका लढण्यासाठी आणि त्या जिंकण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला व उमेदवाराला पारंपरिक स्ट्रॅटेजी ठेवून चालणार नाही. लोक आता आर्थिक समृध्द बनले आहेत. त्यांच्या बहुतांश गरजा भागत आहेत. अशावेळी लोकांना काय किंवा कार्यकर्त्यांना काय, सन्मान हवा असतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी बहुमत मिळाल्यानंतर पहिले उद‍्गार काढले ते असे होते की, “देशातील नागरीकांनी या फकीराची झोळी भरली आहे”!