Sun, May 26, 2019 12:58होमपेज › Konkan › आंबोली वनविभागाचा गलथान कारभार; पर्यटन धोक्यात?

आंबोली वनविभागाचा गलथान कारभार; पर्यटन धोक्यात?

Published On: Jun 27 2018 4:13PM | Last Updated: Jun 27 2018 4:13PMआंबोली : निर्णय राऊत

आंबोलीसह अनेक महत्वाची पर्यटनस्थळे वनविभागाच्या हद्दीत येतात. येथील पर्यटनस्थळांच्या विकास कामांचा निधि पालकमंत्र्यानी थेट वनविभागाकडे दिला. याचाच फायदा घेत विकासाच्या नावावर आंबोलीची ओळख असलेल्या मुख्य धबधब्यावर कॉंक्रीट व दगडांचे बांध घातल्याने धबधबा प्रवाहीत होण्यास अडथळा झाला आहे. तसेच हे बांध थेट धबधबा कोसळतो त्या ओहोळांवर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आले आहेत. त्यात साध्या दगडाचे अनेक बांध घालून फक्त जाळी लावल्याने पावसात पूर्ण क्षमतेने ओहोळ वाहताना ते बांध तुटून त्यातील दगड थेट पाण्यातुन धबधब्याखाली कोसळू शकतात. यामुळे पर्यटक जखमी किंवा जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पावसाळी पर्यटन म्हटल की आवर्जून समोर येते ते आंबोली. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. यात सर्वात आकर्षणाचा केंद्र म्हणजे येथील मुख्य धबधबा. याच मुख्य धबधब्या खाली असंख्य पर्यटक अंघोळ करत मनमुराद आनंद घेत असतात. मात्र गेल्यावर्षी पासून पर्यटन कर आकारणी व पर्यटनस्थाळांच्या विकासकामांसाठी भरघोस निधी पालकमंत्र्यानी वनविभागला दिला. संबंधित विभागाचे संबंधित अधिकारी/कर्मचारी आपल्याला हवा तसा निधि वापरत असल्याचे चित्र आहे. येथील मुख्य धबधब्यावरील ओहोळात कॉंक्रीट व दगडांचे बांध चुकीच्या पध्दतीने घातल्याचे दिसत असून त्यांची कामे ही योग्य दर्जाची झाल्याची दिसत नाहीत. त्यात भर म्हणून तेथीलच दगड फक्त एकमेकांवर ठेवत त्यावर जाळी लावण्यात आली आहे.

जोराचा पाऊस लागला की ओहोळ क्षमतेबाहेर वाहतात. यावेळी पाण्यात (धबधब्यात) एकाचवेळी शेकडो/हजारो पर्यटक अंघोळीचा आनंद घेत असतात. बांध तुटुन अनेक दगड थेट पाण्याद्वारे खाली कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे धबधब्याखाली अंघोळ करणे पर्यटकांसाठी धोक्याचे बनले आहे.  पाऊस संपल्यावर ओहोळ प्रवाह कमी झाल्यावर कॉंक्रीटच्या अनेक बांधामुळे धबधब्याचा प्रवाह बंद होण्याचीही शक्यता आहे. यामुळे संबंधित विभागचे अधिकारी येथील निसर्गामधे चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केल्याने याचा परिणाम निसर्ग तसेच पर्यटनावर होत आहे.