होमपेज › Konkan › आंबेनळी अपघात प्रकरण : कृषी विद्यापीठ अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई सक्‍तीच्या रजेवर

आंबेनळी अपघात प्रकरण : कृषी विद्यापीठ अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई सक्‍तीच्या रजेवर

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:41PMदापोली : प्रतिनिधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातातून बचावलेले एकमेव प्रकाश सावंत-देसाई हेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा ठपका ठेवून मृतांच्या नातेवाईकांनी बुधवारी (दि. 28) आ. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक दिली. प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली. यावेळी कुलसचिव सुभाष चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांचा आदर करीत सावंत-देसाई यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे लेखी पत्र दिले आहे.

आंबेनळी घाटातील भीषण अपघाताला एक महिना उलटला आहे. या अपघातात विद्यापीठातील तीस कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या घटनेतील सत्य अद्याप बाहेर येत नाही. बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे या अपघाताला कारणीभूत आहेत, असा ठपका मृतांच्या नातेवाईकांनी ठेवला आहे. सावंत-देसाई यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत सर्वपक्षीयांनी विद्यापीठावर धडक दिली. यावेळी विद्यापीठाने दिलेला अहवालदेखील संशयास्पद असून परिवहन खात्याच्या अहवालाबाबतही मृतांच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली आहे. 

अपघातानंतर सावंत-देसाई यांनी केलेली विधाने विपर्यास करणारी आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. शिवाय त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठ आवारात फिरकू देऊ नये, अशी मागणी उपस्थितांनी विद्यापीठाकडे केली. यावेळी आ. संजय कदम, पं. स. सभापती राजेश गुजर, उपसभापती दीपक खळे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे आदी उपस्थित होते. अपघाताला महिना झाल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणी विद्यापीठात मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली.

नार्को टेस्टबाबत पोलिसांना पत्र

नातेवाईकांच्या भावनांचा आदर करीत अखेर कुलसचिव सुभाष चव्हाण यांनी तत्काळ प्रकाश सावंत-देसाई यांना 29 रोजी दुपारपासून सक्‍तीच्या रजेवर पाठविले. तसेच विद्यापीठ परिसरात फिरकू न देण्याचा आदेश देखील दिला आहे. याबाबतचे पत्र संबंधितांना देण्यात आले. तसेच नार्को टेस्टबाबत रायगड पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.