Tue, Jun 18, 2019 21:15होमपेज › Konkan › आंबा घाटाची डागडुजी सुरू

आंबा घाटाची डागडुजी सुरू

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:57PMआरवली : वार्ताहर

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या आंबा घाटात सध्या बांधकाम विभागाने मान्सून पूर्व डागडुजी सुरू केली आहे. ही कामे दर्जेदार करून घाट आणखी सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्यात सुमारे 11 किमी लांबीचा हा सर्वात मोठा घाट आहे. गेल्या काही वर्षात पावसाळ्यात घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले होते शिवाय अनेक ठिकाणच्या मोर्‍या खचणे, संरक्षक कठडे तुटणे, रेलिंग तुटून पडणे असे प्रकार वाढले होते. येत्या पावसाळ्यापूर्वी त्यांची डागडुजी करणे गरजेचे होते. पावसाळा तोंडावर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबा घाटाची डागडुजी सुरू केली आहे. यात तीन ठिकाणच्या मोर्‍या नव्याने करण्यात येत आहेत. यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर येण्याऐवजी थेट दरीत जाणार आहे.

सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. घाटाच्या सुरुवातीला साखरपा येथेही एका मोरीचे काम सुरू आहे. शिवाय दोन ठिकाणी संरक्षक कठडे आणि चक्री वळणाजवळ रेलिंगचे काम सुरू आहे. ही कामे पावसाआधी पूर्ण करण्यासाठी बांधकामचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. या कामांप्रमाणेच घाटातील धोकादायक दरडींवरही बांधकाम विभागाने उपाय करावेत,  अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. 
गेल्या तीन वर्षांत ज्या भागात सर्वाधिक वेळा दरडी पडल्या त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या किंवा अन्य सुरक्षिततेचे उपाय योजावेत, अशी मागणी होत आहे. याशिवाय ज्या भागात नव्या मोर्‍या करण्यात येत आहेत त्या भागात काँक्रिटीकरण करावे अशी मागणी होत आहे. पावसाआधी हा संपूर्ण घाट रस्ता सुरक्षित करून पावसाळ्यात वाहनचालकांचा प्रवास सुखकर करावा, अशी रास्त अपेक्षा वाहनचालकांनी केली आहे.