Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Konkan › चिपीच्या माळरानावर चाललीय ‘विमानघाई’!

चिपीच्या माळरानावर चाललीय ‘विमानघाई’!

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:19PMवेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावच्या माळरानावर आयआरबी कंपनीचे तंत्रज्ञ, कामगार, अधिकारी दिवसरात्र राबत आहेत. विमानतळाच्या इमारतीला एक  सुंदर ‘लुक’ प्राप्त झाला आहे. ठरलेल्या 12 सप्टेंबर रोजीच्या मुहूर्तावर विमान लॅण्ड करण्यासाठी एकीकडे ही विमानघाई सुरू असताना दुसरीकडे धावपट्टी आणि विमानतळाची मुख्य इमारत यांच्यामध्ये काम सुरू असून तिथे गुरेढोरेही फिरताना आढळत आहेत. 12 सप्टेंबर रोजीच्या मुहूर्तावर विमान लॅण्ड करण्याची राजकीय घोषणा केली असली तरी  लॅण्डींगपूर्वी हा विमानतळ तांत्रिक आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने परिपूर्ण असावा, असे मत अगदी सर्वसामान्य माणसांकडूनही व्यक्‍त होत आहे. 

चिपी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर ओरीसा राज्याची राजधानी भुवनेश्‍वर येथील बिजूू पटनायक विमानतळाची आठवण येते. भुवनेश्‍वर शहरापासून काही मैल दूर असणारे ते विमानतळ आणि चिपी विमानतळ यांचा लूक बहुतांशी प्रमाणात सारखाच आहे. 

कुडाळवरून जाताना परूळे गावातून वर माळरानावर चढल्यानंतर मालवण-वेंगुर्ले हा सागरी महामार्ग लागतो. याच मार्गावर चिपी विमानतळ वसविण्यात आले आहे. अडीच कि.मी. धावपट्टी, विमानतळाची मुख्य इमारत, टॉवर, त्याला जोडणारी इमारत, अधिकारी, कर्मचार्‍यांची निवासस्थाने ज्या जागेत उभारण्यात आली आहेत, ती जागा धरूनच एकूण 271 हेक्टर जागा आयआरबी कंपनीच्या ताब्यात आहे. तब्बल 520 कोटी रूपये आयआरबी या विमानतळाच्या उभारणीसाठी खर्च करत आहे आणि ही 271 हेक्टर जमीन विमानतळासह 95 वर्षे आयआरबीच्या ताब्यात राहणार आहे. 

सध्या विमानतळाच्या मुख्य इमारतीकडे जाणार्‍या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. डांबरीकरणाने काम चालू आहे. कुठल्याही विमानतळाचे आकर्षक प्रवेशद्वार असावे असेच याही विमानतळाचे आहे. गेटपासून काऊंटर, तपासणी कक्ष आणि प्रवाशांना विमानाच्या गेटजवळ बसण्यासाठी लॉन्ज या सुविधांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही मोठ्या विमानतळाच्या इमारतीत प्रवेश केल्याचे ‘फिलींग’ होते. 

ज्या धावपट्टीच्या लांबीवरून मध्यंतरी राजकीय वाद झाला होता ती धावपट्टी तब्बल अडीच कि.मी. लांबीची आहेत. गोवा विमानतळाच्या धावपट्टीची लांबीही इतकीच आहे आणि त्यावर आंतरराष्ट्रीय विमानेही उतरतात. चिपी विमानतळाची लांबी तब्बल 5 कि.मी. पर्यंत वाढवता येऊ शकते, एवढा त्याला ‘स्कोप’ आहे. त्याचा फायदा असा की, तब्बल 15 विमाने चिपी विमानतळावर पार्क करता येऊ शकतात. देशभरातील अनेक विमानतळांवर विमाने पार्कींगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात गोवा विमानतळाचाही समावेश आहे. या विमानतळाला चिपी विमानतळाचा पार्कींगसाठी फायदा होऊ शकतो. 

अडीच कि.मी लांबीची धावपट्टी तयार आहे. मुख्य इमारत आणि धावपट्टी यांच्यामध्ये अजूनही मातीचा भाग आहे. विशेष म्हणजे या भागात काही गुरे फिरतानाही दिसली. तिथेच एक जेसीबी मशीन उभी होती. मुख्य इमारतीच्या समोर 3 जेसीबी मशीन युध्द पातळीवर काम करत होत्या. कातळ फोडण्याचे काम सुरू होते. मुख्य इमारतीला जरी विमानतळाचा देखणा ‘लूक’ प्राप्त झाला असली तरी परिसराला मात्र अद्यापही ओबड-धोबड रूप आहे. 12 सप्टेंबर रोजी या विमानतळावर विमानलॅण्ड करण्याचा दिवस निश्‍चित झाला आहे. कोकणातील आवडता सण गणेश चतुर्थी 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. योगायोगाने सिंधुदुर्गचे सुपूत्र केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक खाते आहे. सुरेश प्रभू दरवर्षी न चुकता गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सिंधुदुर्गात येतात. मालवणच्या घरी ते गणपतीची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे 12 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गभूमीवर विमान लॅण्ड होताना त्याचे स्वागत करताना या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार म्हणून सुरेश प्रभू हे त्या दिवशी उपस्थित असणारच आहेत व त्याशिवाय मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी झाडून सारे स्वागतासाठी तिथे असतीलच. 

अर्थात 12 सप्टेंबर रोजीचे लॅण्डींग हे टेस्टआहे. त्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण नियमीत विमान वाहतूकीला परवानगी देणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जावू शकतो. डिसेंबर 2018 या महिन्यापासून चिपी विमानतळावरून राजधानी मुंबईकडे विमान झेपावेल, असे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. 

लॅण्डींगची टेस्ट होण्यासाठी आता 14 दिवस शिल्लक आहेत. या दोन आठवड्यात महावितरणकडून वीज पुरवण्याचे काम पूर्णपणाने करावे लागणार आहे. परूळे येथील एमआयडीसीने खोदलेल्या एका विहिरीतून विमानतळाला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. भविष्यात कुडाळ एमआयडीसी येथून 10 कोटी रूपये खर्च करून तिथे पाणीपुरवठ्याची योजना आखण्यात आली आहे. अशा प्रकारे पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, रस्ते, सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना हे सर्व काही पूर्ण व्हावे आणि मगच परिपूर्णतेने मालवणी माणसांनी भरलेले विमान आकाशात झेपावले जावे, एवढीच अपेक्षा आहे.