Thu, Apr 25, 2019 23:50होमपेज › Konkan › सिंधुदुर्गची कृषी अर्थव्यवस्था काजू प्रधान बनेल  

सिंधुदुर्गची कृषी अर्थव्यवस्था काजू प्रधान बनेल  

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:15PM

बुकमार्क करा

कुडाळ ः शहर वार्ताहर

देशात काजू उत्पादकता व उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 52 हजार हेक्टर  पडीक जमिनीचे क्षेत्र असून या जमिनीमध्ये  मोठ्या प्रमाणात काजू लावडीवर भर द्यावा. काजू उत्पादनात वाढ झाल्यानंतर जिल्ह्याचा आणखीन नावलौकिक होईल, तसेच जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था काजूप्रधान बनेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी  व्यक्त केले.

 सिंधुदुर्ग जि. प. आयोजित सिंधु कृषी पशुपक्षी मत्स्य प्रदर्शन व मेळाव्यात  मंगळवारी काजू परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी  उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.  जि.प. अध्यक्षा सौ.  रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, संचालक आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, सौ. प्रज्ञा परब, दोडामार्ग सभापती गणपत नाईक, उपसभापती सौ. सुगंधा धर्णे, जि.प.सदस्या संपदा देसाई, जिल्हा कृषि अधिकारी शिवाजी शेळके, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कृषी संचालक सुधीर चव्हाण, स्नेहसिंधुचे  हेमंत सावंत, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, डॉ. प्रसाद देवधर आदीसह शास्त्रज्ञ व शेतकरी, मुळदे कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  म्हणाले, जिल्ह्याला काजू पीकाचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. ऊस, आंबा पिकांपेक्षाही काजू लागवडीत कमी जोखीम व उत्पादनाची हमी अशीस्थिती आहे. यासाठी शेतकर्‍यांनी काजू लागवडीवर भर द्यावा. यातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था व शेतकरी सक्षम होतील. जिल्ह्याची काजू प्रोसेसिंग क्षमता पाहता  केवळ 70 टक्के काजू जिल्ह्यात उत्पादीत होतो. तर उर्वरीत 30 टक्के काजू कारखानदारांना अन्य देशातून आयात करावा लागते.  हे चित्र पहाता काजू उत्पादन क्षेत्रात अमाप संधी असल्याचे श्री. चौधरी म्हणाले. 

सतिश सावंत यांनी ही मार्गदर्शन केले. या कृषी प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  योगेश परूळेकर, चंद्रशेखर देसाई,  सुरेश बोवलेकर, विजय सावंत, बाळकृष्ण गाडगीळ व राजाराम मावळकर यांनी काजूवर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रफुल्‍ल वालावलकर यांनी केले.