Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Konkan › राज्य प्राथ. शिक्षक समितीचे धरणे

राज्य प्राथ. शिक्षक समितीचे धरणे

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:36PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

2017-18 या शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहारात निर्माण झालेली अनियमितता दूर करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन व चर्चा करूनही पोषण आहारातील अनियमितता दूर झाली नाही. शालेय पोषण आहार इंधन मानधन रोखून धरले गेले. यामुळे शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सदस्यांनी जि. प. प्रवेशद्वारावर धरणे धरली.

पुरवठाधारकाकडून धान्यादी मालाचा वेळीच पुरवठा केला न जाणे, धान्यादी माल मोजमाप करून न देणे, स्वयंपाकी मानधन, इंधन मानधन वेळेत न मिळणे अशी स्थिती असताना सर्व शिक्षक शालेय पोषण आहार ही कल्याणकारी योजना सुरळीत चालू राहावी, यासाठी स्वखर्चातून ही योजना चालवीत आहेत. तरीही शालेय पोषण आहाराची दरदिवशी भरावी लागणारी ऑनलाईन माहिती भरली गेली नाही. या कारणास्तव शाळांचे इंधन मानधन रोखून धरण्यात आलेले आहे.

शिक्षक विविध विषयांची ऑनलाईन माहिती सायबर कॅफेत जाऊन शिक्षक स्वखर्चाने भरत आहेत. मात्र, नियमित शालेय पोषण आहाराची माहिती सर्वच शाळांमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने तसेच नेटवर्कही मिळत नसल्याने भरणे शक्य नाही. त्यामुळे या योजनेची ऑनलाईन माहिती भरणे शिक्षकांनी बंद केले आहे. मात्र, ही कल्याणकारी योजना सुरळीत चालू ठेवण्याचे काम शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत व या योजनेचा हिशेब दरमहा हार्ड कॉपी स्वरूपात प्रशासनास सादर केला जात आहे. मात्र, जून 2017 पासून सुविधांअभावी  ऑनलाईन माहिती न भरल्याने शाळांचे इंधन मानधन रोखून धरले आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीने शनिवारी निदर्शने करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार राणे, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष सुनील गाड, लहू दहिफडे, कार्याध्यक्ष सदानंद मोरे आदींसह  शिक्षक सहभागी झाले होते.

त्या’ विधानाचा निषेध : राणे

“प्राथमिक शाळांमधे शिजविला जाणारा पोषण आहार हा शाळेतील शिक्षकच खातात” असे विधान अंगणवाडी संघटनेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांनी तसेच स्वयंपाकी संघटनेने केला होता. या विधानाची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने गंभीर दखल घेतली असून समितीचे अध्यक्ष नंदकुमार राणे यांनी याचा जाहीर निषेध केला आहे.