होमपेज › Konkan › ‘जैतापूर’चा संघर्ष पुन्हा पेटणार

‘जैतापूर’चा संघर्ष पुन्हा पेटणार

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:42PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

बर्‍याच अवधीनंतर जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधाचे वारे जोरात वाहणार आहे.  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात कोकण जनहक्क समिती व शिवसेनेतर्फे  सोमवारी (दि. 27)जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून साखरीनाटे ते माडबन असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जैतापूरचा संघर्ष पेटणार आहे.

माडबन परिसरात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प होणार आहे. मुळात एकाच तालुक्यात, जवळजवळ 25 कि.मी.च्या परिघात असे दोन प्रकल्प होणार आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष सोयीनुसार भूमिका घेत आहेत. 

शिवसेनेने दोन्ही प्रकल्पांना विरोध करणार्‍या स्थानिकांना पाठिंबा दिला आहे. भाजपने या प्रकल्पांचे समर्थन केले आहे. काँग्रेसचा जैतापूरला पाठिंबा, तर नाणारला विरोध, असा दुटप्पी पवित्रा आहे. राष्ट्रवादीचा सूरही काँग्रेसच्या सुरात मिसळणारा आहे. काँग्रेसमध्ये असताना जैतापूरला नारायण राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आता मात्र रिफायनरी प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. राणेंची ही भूमिका त्या-त्या वेळेनुसार आहे. मनसेने जैतापूरविरोधात ना सूर आळवला ना त्याचे समर्थन केले. मात्र, रिफायनरी विरोधात जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका मनसेची आहे. आता राहता राहिला विरोध स्थानिकांचा. तर तो मच्छीमार, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचा विरोध हा त्यांच्या जाणार्‍या जमिनी, उदरनिर्वाह, विस्थापित होण्याची भीती, प्रदूषणाच्या मुद्यावर तर आहेच शिवाय प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नावरही हा विरोध आहे. त्यामुळे आगामी काळात होणारी आंदोलने ही या विरोधाची धार ठरविणारी ठरणार आहेत.

2008 च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. राष्ट्रीय हिताचा प्रकल्प जाहीर करुन केद्र सरकारने स्थानिक लोकांच्या विरोधाला न जुमानता 980 हेक्टर जमीन हस्तांतरीत करुन घेतली होती. मात्र, स्थानिकांचा कायम विरोध राहिला असला तरी, त्याकडे सरकारी पातळीवर दुर्लक्ष करण्यात येत होते. शिवसेनेच्यादृष्टीने दोन्हीकडे विरोधाची भूमिका असताना दोन्ही आंदोलने एकत्रित होण्याची गरज आहे. त्यामुळेच कदाचित  ‘जैतापूर’च्या अनुषंगाने आज, सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. अणुऊर्जा प्रकल्प विरोधात कोकण जनहक्क समिती व शिवसेना पक्षातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.