Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’विरोधात आज मुंबईत दिंडी

‘रिफायनरी’विरोधात आज मुंबईत दिंडी

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 10:07PMराजापूर : प्रतिनिधी

शंभर टक्के विरोध असतानादेखील तो न पाहणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेच्या वतीने सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त दादर रेल्वेस्थानक ते वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणार्‍या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली.

नाणार परिसरातील 14 गावांतील जनतेचा रिफायनरी प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असून शासन मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील दोन वर्षांत रिफायनरी विरोधात  अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, शासनावर त्याचा जराही परिणाम झालेला नाही. त्यामुळे आता साक्षात पांडुरंगालाच साकडे घालण्याचा निर्णय रिफायनरी विरोधी संघटनेने घेतला आहे. त्यासाठी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनजवळ असलेले पूर्व हनुमान मंदिर ते वडाळ्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अशी दिंडी सोमवारी सायंकाळी 4 वाजता आषाढी एकादशीला काढली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोकणवर आलेले रिफायनरी प्रकल्पाचे संकट दूर करून येथील पर्यावरणाचे रक्षण करावे, हाच या दिंडी यात्रेमागील मुख्य हेतू असल्याचे वालम यांनी सांगितले. समस्त रिफायनरीविरोधी बांधवांनी या दिंडी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन वालम यांनी केले आहे.