Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Konkan › आदित्य ठाकरे शुक्रवारी चिपळुणात

आदित्य ठाकरे शुक्रवारी चिपळुणात

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 11:30PMचिपळूण : शहर वार्ताहर

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार अवस्थेत आली असून, शिवसेनेने ही निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा ‘पण’ केला आहे. या पार्श्‍वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे दि. 8 जून रोजी चिपळूण दौर्‍यावर येत आहेत.

शहरातील माटे सभागृहात दुपारी 4.30 वाजता ते युवकांशी संवाद साधणार आहेत. पदवीधर मतदारसंघात ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी ठाण्याचे माजी महापौर व खेडचे पुत्र संजय मोरे यांना उमेदवारी दिली असून स्वबळाचा नारा दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केलेले अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना भाजपने प्रवेश करतानाच उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने यावेळी नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. 

शिवसेना व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वत: या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत. निवडणुकीची जबाबदारी घेऊन ते चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सेना पदाधिकार्‍यांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी केली आहे. या अनुषंगाने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.

चिपळुणात होणार्‍या मेळाव्याला युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.