होमपेज › Konkan › तडीपारीचा आदेश आयुक्‍तांकडून रद्द

तडीपारीचा आदेश आयुक्‍तांकडून रद्द

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:56PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी अनिवासी भारतीय उद्योजकासह त्यांच्या अभियंता मुलाला हद्दपार करण्याचा दिलेला आदेश कोकण विभागीय आयुक्‍तांनी रद्द केला. वैयक्‍तिक स्वरूपाच्या वादातून नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे तडीपार कारवाई करणे चुकीचे असल्याचा युक्‍तीवादात तथ्य असल्याचे कोकण आयुक्‍तांनी आदेशात म्हटले आहे.

रत्नागिरी शहरातील निवखोल येथे राहणारे अनिवासी भारतीय चाँदखान हसन बुडये व त्यांचा स्थापत्य अभियंता मुलगा जिशान यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेंडगे यांनी तडीपार करण्याचा आदेश नोव्हेंबर महिन्यात दिला. या आदेशाविरूद्ध बुडये यांनी कोकण आयुक्‍तांकडे अपील केले होते. आयुक्‍तांसमोर झालेल्या सुनावणीवेळी बुडये यांच्या वकिलांनी प्रभावी युक्‍तीवाद केला. त्यासंदर्भात पुराव्यादाखल कागदपत्रेही सादर केली.

वैयक्‍तिक वादातून झालेल्या गुन्ह्यांच्या आधारे हद्दपार कारवाई करणे योग्य ठरत नाही. अपीलकर्त्या पिता-पुत्राला बचावाची पुरेशी संधी मिळालेली नाही. प्रांतांच्या आदेशात हद्दपार करण्यासाठी इतर संयुक्‍तिक कारण दिलेले दिसत नाही. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी दिलेला तडीपार करण्याचा आदेश समर्थनास पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण कोकण आयुक्‍तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

अपीलकर्ते चाँदखान बुडये, मुलगा जिशान यांच्यातर्फे मांडण्यात आलेले बहुतांश मुद्दे कोकण आयुक्‍तांनी मान्य केले. त्यातून निष्कर्ष काढत आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात प्रांताधिकारी शेडगे यांनी केलेला हद्दपारीचा आदेश समर्थनिय नसल्याचे सांगत आयुक्‍तांनी तो आदेश रद्द केला आहे.