Thu, Mar 21, 2019 16:10होमपेज › Konkan › तळाशिल परिसराला उधाणाचा तडाखा

तळाशिल परिसराला उधाणाचा तडाखा

Published On: Aug 12 2018 10:30PM | Last Updated: Aug 12 2018 10:11PMआचरा : वार्ताहर

रविवारी समुद्राला आलेल्या महाकाय उधाणाचा फटका तळाशिलला बसला आहे. तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागाची मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्र गावातील वस्ती व रस्ता यामध्ये अवघे 20 फुटांचे अंतर राहिले आहे. जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. रविवारी आलेल्या उधाणामुळे कोचरेकर कॉलनी ते संजय जुवाटकर यांचे घरदरम्यानच्या 800 मीटर किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून समुद्राचे पाणी वस्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण तहसीलदारांनी वस्तुस्थितीतची पाहणी केली आहे. दरम्यान, यावर  तातडीने उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ आज जिल्हाधिकार्‍यांची  भेट घेणार आहेत. 

उधाणामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळत असून वेगाने येणार्‍या लाटांच्या मार्‍यामुळे तळाशिल किनार्‍याची वेगाने धूप होत आहे. या किनार्‍यालगतच असलेली सुरूची झाडे कोसळून पडत आहेत. मुख्य वीजवाहिनीचे पोलही समुद्रात गडप होण्याचा धोका असून, गाव अंधारात बुडण्याची भीती आहे. कोचरेकर कॉलनी मधील विरेश कोचरेकर यांच्या दुकानालाही धोका निर्माण झाला आहे.  उधाणाचा धोका लक्षात घेऊन माजी सरपंच संजय केळुसकर, शेखर कोचरेकर, दुकान मालक विरेश कोचरेकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

 रविवारी आलेल्या उधाणामुळे तळाशिल किनारी भागाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नारळी पौर्णिमेला येणारे संभाव्य उधाण लक्षात घेता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रविवारी आलेले उधाण हे चार दिवस टिकणार असल्याने धोका वाढू लागला आहे. तळाशिल कोचरेकर कॉलनी भाग ते संजय जुवाटकर यांचे घर या 800 मीटर भागत मागणी असूनही बंधारा न झाल्याने बंधार्‍याविना असलेला भाग समुद्र गिळंकृत करत आहे. या किनारी असलेले एक दुकान व शौचालय समुद्रात विलीन होण्याची भीती आहे.