Thu, Jan 23, 2020 03:49होमपेज › Konkan › दरीत कोसळून व्हॅन चालकाचा मृत्यू

दरीत कोसळून व्हॅन चालकाचा मृत्यू

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 11:13PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

ओमनी गाडीतून दारूची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून  उत्पादन शुल्क विभागाकडून पाठलाग सुरू असताना मध्येच गाडी सोडून चालक घाबरून पळत सुटला. यावेळी अंधारातून अंदाज न आल्याने जवळेथर खिंडीत सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून चालक शब्बीर फकीर मुकादम (53, रा. वालये) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईवर मुकादम यांची पत्नी शहीदा मुकादम हिने या घटनेबाबत शंका व्यक्‍त केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

शब्बीर फकीर मुकादम हे पत्नीसह त्यांच्या  गाडीतून चालले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास कोंडवशी परिसरात समोर एक गाडी उभी होती. गाडीतील एक्साईजच्या अधिकार्‍यांनी मुकादम यांची ओमनी पहिल्यानंतर आत दारू आहे. या संशयातून त्या गाडीचा  पाठलाग सुरू केला. 

पाठलागादरम्यान शब्बीर मुकादम यांनी मुख्य मार्ग सोडून जवळेथरकडे जाणार्‍या एका कच्च्या रस्त्याने आपली गाडी वळवली. त्या पाठोपाठ पाठलाग करणारी गाडी येत असल्याचे पाहून शब्बीर मुकादम यांनी आपली गाडी बाजूला उभी केली व धावू लागले. दरम्यान, मागून आलेल्या गाडीतील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही गाडीतून उतरून मुकादम यांचा पाठलाग करू लागल्याने मुकादम घाबरले. रात्रीच्या अंधारात पळत असताना बाजूच्या कठड्यावरून ते  खोल दरीत कोसळले. तेथे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर एक्साईजच्या अधिकार्‍यांनी व्हॅनमध्ये असलेल्या मुकादम यांच्या पत्नीला घरी पाठविले व त्यांची गाडी घेऊन ते निघून गेले. याचदरम्यान शहीदा मुकादम यांनी  या घटनेची माहिती मुलाला व नातेवाईकांना दिल्यानंतर ते सर्व जण जवळेथर खिंडीच्या दिशेने धावले. तेथे शोध घेत असता शब्बीर मृतावस्थेत आढळले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाठलाग झालेल्या  ‘त्या’ ओमनी व्हॅनमधून खरोखरच दारूची वाहतून होत होती का, याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. या घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.