Thu, Apr 25, 2019 23:56होमपेज › Konkan › कार अपघातात कुडाळचा युवक गंभीर

कार अपघातात कुडाळचा युवक गंभीर

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 10:54PMकुडाळ : शहर वार्ताहर

मुंबई- गोवा महामार्गावर आकेरी-हुमरस येथे झालेल्या कार अपघातात चेतन पडते (29, रा.कुडाळ बाजारपेठ) हा युवक गंभीर जखमी झाला. तर अन्य चारजणांना किरकोळ दुखापत झाली. रविवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास हा अपघात झाला. चेतन पडते याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आलेे.

कुडाळ बाजारपेठ येथील चेतन पडते, अभि गावडे, संकेत सडवेलकर, महेश शिरसाट व अभि गावडे यांची लहान भाची असे  पाचजण कारने सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने येत होते. आकेरी-हुमरस दरम्यान चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत गटारात पलटी झाली. यामध्ये कारच्या एअरबॅग फुटल्या, मात्र कारचे दरवाजे न उघडल्याने सर्वजण कारमध्ये काही काळ अडकून पडले. त्यांनी दरवाजाच्या काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. 
अखेर वाहनधारक व ग्रामस्थांनी कारच्या काचा फोडून सर्वांना बाहेर काढले. 

यात चेतन पडते याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. राजन भगत व अन्य ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.पंडीत व सहकार्‍यांनी उपचार सुरू केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आलेे. तर अन्य जखमींवर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष आबा धडाम, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, नगरसेवक ओंकार तेली, सचिन काळप, सुनील बांदेकर, अश्‍विनी गावडे, साक्षी सावंत, संध्या तेरसे, संजय भोगटे, मयूर शिरसाट, मंदार शिरसाट, प्रसाद पडते, सौ.स्नेहल पडते, प्रसाद शिरसाट, राजू पाटणकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी रूग्णालयात धाव घेतली होती. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

Tags :  mumbai goa highway, accident