होमपेज › Konkan › दाभिळनजीक भीषण अपघातात दोन ठार

दाभिळनजीक भीषण अपघातात दोन ठार

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 1:01AMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास दाभिळ गावानजीक गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट मोटारीला मुंबईहून गोव्याच्या दिशेला जाणार्‍या टँकरने समोरासमोर धडक दिली. या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाले, तर  दोन जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एक जण लोटेतील व्हीडीएल कंपनीचा डायरेक्टर असल्याचे समजते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. 1) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट डिझायर मोटार खेड तालुक्यातील दाभिळ गावानजीक आली असता मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या टँकरने मोटारीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारा एक जण जागीच ठार झाला, तर एक जण उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडला. अन्य एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी गिरीश बर्वे यांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान विशाल मातले (30, रा. कराड) याचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या राकेश वडाळकर (45, रा. मुंबई) व किरकोळ जखमी  राजेश जोशी (50, रा. मुंबई) यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बर्वे हे लोटेतील व्हीडीएल कंपनीचे डायरेक्टर असल्याचे समजते. 

हे सर्व लोटे औद्योगिक वसाहतीमधील व्हीडीएल कंपनीत कामानिमित्त आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काम आटोपून परत जात असताना अपघात झाल्याचे समजते.  अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबली होती. शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांतून जखमींना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. लोटे पोलिस दूरक्षेत्रातील कर्मचारी जयवंत सोनवळे, विवेक साळवी यांच्यासह खेड पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत खेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद नव्हती.