Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › चार मोटारसायकलींचा अपघात; एकाचा मृत्यू

चार मोटारसायकलींचा अपघात; एकाचा मृत्यू

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 11:58PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर  आहे. त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. मात्र, यातील पिंगुळी वडगणेश येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या राहुल रमेश चव्हाण (25) याचा म्हापसा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिराजवळ सायंकाळी दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या धडकेत स्वार राजेश माने (रा. कुडाळ) व राहुल रमेश  चव्हाण (25, सध्या रा. कुडाळ, मूळ रा. विजापूर) यांना गंभीर दुखापत झाली. माने पिंगुळीच्या दिशने तर चव्हाण कुडाळच्या दिशेने येत होता. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राहुल चव्हाण याची प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, राहुलची प्रकृती अधिकच खालावल्याने म्हापसा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल हा डंपरचालक होता.

 पिंगुळी म्हापसेकरतिठा येथे दुपारी दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. यात कृष्णा आत्माराम मयेकर (65, रा. पिंगुळी) यांच्या मोटारसायकलला समोरून येणार्‍या मोटारसायकलची  धडक बसली. यात मोटारसायकलस्वार पिंटू चव्हाण व मागे बसलेला मंगेश चव्हाण हे जखमी झाले. तसेच स्वार मयेकर यांच्यासह त्यांच्यासमवेत असलेल्या दोन लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक ओंकार तेली, सुनील बांदेकर, मंदार शिरसाट, राजेश म्हाडेश्‍वर आदींसह लोकप्रतिनिधी, व्यापारी व नागरिकांनी रूग्णालयात धाव घेतली. अपघातादरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

निळेली-माणगाव येथे रस्त्यालगतच्या निसावर मोटारसायकल आदळून मोटारसायकलस्वार रसिक रघुनाथ परब (30, रा. हळदीचे नेरूर) हा युवक गंभीर जखमी झाला तसेच त्याच्या मागे बसलेला युवकही किरकोळ  जखमी झाला. श्रावण धुरी व ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात  दाखल केले मात्र रसिक परब याची प्रकृती गंभीर  बनल्याने येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने  गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले तसेच कुडाळ शहरातील  केळबाईवाडी रस्त्यावर मोटारसायकल कणकीच्या बेटावर आदळून मोटारसायकलस्वार श्री. कुमठेकर व त्यांच्या समवेत असलेला एक इसम असे दोघेही जखमी झाले. माजी ग्रा.पं. सदस्य नितीन सावंंत यांनी जखमींना  उपचारासाठी  येथील ग्रामीण रूग्णालयात  दाखल केले. सर्व जखमींवर रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौरव घुर्ये व सहकार्‍यांनी उपचार केले. या अपघाताच्या घटनांनी ग्रामीण  रुग्णालय आवारात नागरिकांनी मोठी गर्दी जमा झाली होती.