देवगड : प्रतिनिधी
कुणकेश्वर- चांदेलवाडी येथील पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर भरधाव डंपर व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास घडला.
दाभोळे येथील पुंडलिक अनंत अनभवणे यांच्या मालकीचा डंपर घेवून चालक आनंद दत्ताराम ठाकूर हे कातवणहून किंजवडेच्या दिशेने येत होते.तर रिक्षाचालक अनिकेत गणपत गावडे(30) हे रिक्षेने इळये येथून मुणगेकडे प्रवाशी घेवून जात होते. कुणकेश्वर- चांदेलवाडी पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर डंपर व रिक्षाची समोरासमोर धडक बसून अपघातात डंपरच्या धडकेने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.
या अपघातात रिक्षाचालक अनिकेत गावडे याच्या उजव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवाशी प्रतीक्षा प्रवीण कुडाळकर(35) व प्रदीप पांडूरंग रूपये(32, रा.इळये वरंडवाडी) ही दोघं बहीण-भाऊ व रिक्षाचालक या तिघांनाही तात्काळ उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच कुणकेश्वर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले.
या अपघातामध्ये रिक्षेचे सुमारे 80 हजाराचे नुकसान झाले. अपघाताची खबर अमोल रूपये यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. भरधाव वेगाने डंपर चालवुन अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी डंपरचालक आनंद दत्ताराम ठाकूर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक राजन पाटील करीत आहेत.