होमपेज › Konkan › खेडमध्ये महामानवाच्या पुतळ्याची विटंबना

खेडमध्ये महामानवाच्या पुतळ्याची विटंबना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

तीनबत्ती नाकानजीकच्या जिजामाता उद्यानात पालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने सोमवारी पहाटे विटंबना केल्याने खेड तालुक्यात माहिती मिळताच खेडमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

दि. 26 रोजी सकाळी 6 वाजल्यानंतर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी या परिसरात साफसफाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही गोष्ट पालिकेचे अधिकारी, पोलिस व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुतळ्याचा विटंबना केलेला भाग पांढर्‍या कपड्याने झाकून ठेवला. 
खेडचे तहसीलदार अमोल कदम, स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी जिजामाता उद्यान परिसरात या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. आंबेडकर अनुयायी विविध संघटना, राजकीय पक्ष, खेड तालुका बौद्ध समाज सेवासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तत्काळ तपास करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. 

उच्चस्तरीय चौकशी करा

 महामानवाच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ खेडमध्ये बंद राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत या आवाहनाला प्रतिसाद दिला. खेड तालुक्यासह चिपळूण, महाड, मंडणगड, दापोली, चिपळूण व गुहागर आदी तालुक्यांतून नागरिक खेडमध्ये आल्याने हजारोंचा जनसमुदाय पुतळा परिसरात जमा झाला होता.
पोलिसांनी तत्काळ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथकाला पाचारण केले. सातारा येथून पोलिसांच्या श्‍वानपथकातील ‘रियो’ हे श्‍वान घटनास्थळी दाखल झाले. रियोने सम्राट अशोक नगरपर्यंत गुन्हेगारांचा माग काढला. पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली आहे. माग काढलेल्या मार्गावर काही पदचिन्हेदेखील पोलिसांना सापडली आहेत. पोलिसांनी काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

उच्चस्तरीय चौकशी व्हावी : ना. रामदास कदम

खेड तालुक्यातील सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांना तत्काळ शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीदेखील चौकशीचे आदेश देण्याचे आश्‍वासन दिले.

डॉ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल : गृहराज्यमंत्री

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली असुन याप्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे. तसेच  त्याठिकाणी अतिरिक्‍त पोलिस तैनात करण्यात येत असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत सांगितले.खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. संजय कदम यांनी हा प्रश्‍न उपस्थित करत त्याठिकाणी प्रक्षोभाचे वातावरण असल्याचे सांगितले. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची खबरदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनीही याचा उल्लेख केला. 

Tags : Kokan, Kokan News, abuse,  babasaheb ambedkar, statue


  •