आरवली : वार्ताहर
कोकणातील महिला बचत गटांनी विविध लघु उद्योगातून आपली प्रगती साधली आहे. उन्हाळ्याच्या हंगामासाठी शीतपेय विक्रीतून आर्थिक घडी बसवण्यासाठी महिला बचत गट सरसावले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावातील महिला बचतगटाने तर उन्हाळी हंगाम सुरू होताच उसाच्या रसाचे दुकान सुरू केले आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळी हंगामासाठी अनेक बचत गटांनी काकडी आणि कलिंगडाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले असून त्यामध्येही त्यांना यश येत आहे.
यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातून येणार्या कलिंगडांना आव्हान देत स्थानिक शेतकर्यांनी कलिंगडांची तेजीत विक्री केल्याची उदाहरणे आहेत. सामुहिक श्रमातून केली जाणारी कलिंगड लागवड महिला बचतगटांना आणि शेतकर्यांनाही आर्थिक सक्षम करीत असल्याची उदाहरणे संगमेश्वरनजीक गावमळा, कुरधुंडा, परचुरी या गावांतून पहायला मिळत आहेत.
उन्हाळ्याचा जोर जसजसा वाढत जाईल तसतशी या शीतपेयांना असणारी मागणी वाढत जाणार असून केवळ नैसर्गिक शीतपेयांच्या विक्रीतूनच कोकणात लाखोंची उलाढाल होणार आहे.
वातावरणातील उष्मा वाढू लागला आहे. बाजारपेठेत कलिंगडासह शीतपेयांची मागणी वाढली आहे. कृत्रिम शीतपेयांपेक्षा नैसर्गिक शीतपेयांवर सर्वांचा जोर असून यामुळे स्थानिक लघुउद्योजकांना चालना मिळत आहे.
गतवर्षी पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी झाले. पावसाने विश्रांती घेतल्यावर लांबलेल्या थंडीला सुरवात झाली. सुरवातीचे काही दिवस मळभ आणि थंडी असा प्रकार सुरू झाल्यावर जानेवारी महिन्यात मात्र वातावरणाने चांगलीच साथ दिली. संपूर्ण जानेवारी महिना गुलाबी आणि दवयुक्त कडाक्याच्या थंडीचा गेला. या कालावधीत जिल्ह्यात आणि राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच थंडीने कडाका केला होता. थंडीच्या कडाक्याने आंबा आणि काजूलाही चांगला मोहोर आला.
उन्हाळ्याची चाहूल लागली की, दरवर्षी शीतपेयांची विक्री जोर धरते. यावर्षी आतापासूनच कलिंगडासह शीतपेयांच्या मागणीला जोर वाढू लागला आहे. थंडीच्या हंगामात बंद असलेल्या शीतपेयांची दुकाने, हातगाड्या आता पूर्ववत सुरू झाल्या आहेत. कृत्रिम शीतपेयांच्या तुलनेत नैसर्गिक शीतपेयांची मागणी वाढताना दिसत आहे. कलिंगडाप्रमाणेच लिंबू सरबत, कोकम सरबम, आवळा सरबत, जांभूळ सरबत, काजू आणि करवंदाचे सरबत अशा पेयांना चांगली मागणी आहे. याचबरोबरीने ताक विक्रीचा व्यवसायही जोर धरू लागला असून ताकाप्रमाणेच संगमेश्वरच्या प्रसिद्ध मठ्ठ्याला जोरदार मागणी आहे.