Thu, Apr 25, 2019 13:42होमपेज › Konkan › लाखो रुपये थकित तरी महसूल विभाग निद्रिस्त

लाखो रुपये थकित तरी महसूल विभाग निद्रिस्त

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 9:29PMआरवली : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यात उभारण्यात आलेले खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर कंपन्या लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असताना महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

संगमेश्‍वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आयडिया, वोडाफोन, एअरटेल आदी कंपन्यांसह इतरही खासगी कंपन्यांनी टॉवर उभारुन मोबाईल सेवा सुरु केली आहे.  यातील काही कंपन्यांनी तर ग्रामपंचायतींची परवानगीही घेतली नसल्याचे बोलले जात आहे. 

मोबाईल टॉवर उभारुन अनेक वर्षे उलटली तरी अद्याप एकही रुपया या खासगी मोबाईल टॉवर मालकांनी भरलेला नाही. या संदर्भात संबंधित टॉवर मालकांना महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीतर्फे कराची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.  मात्र, या कंपन्यांनी नोटिसांना केराच्या टोपल्या दाखविल्याचे निदर्शनास आले आहे.

या महसुलाची रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे. आर्थिक वर्ष अखेर पुढील महिन्यात असल्याने मोबाईल टॉवर कंपन्यांकडून थकित रक्कम जमा न झाल्यास शासनाचे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे नुकसान होणार आहे.

एखाद्या खासगी व्यावसायिक किंवा घरमालकांकडे शंभर रुपये जरी थकित असले तरी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगाडला जातो, मग या लाखो रुपये थकवणार्‍या कंपन्यांवर मेहरनजर का, असा सवाल आता  सामान्य नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी थकित कराची लाखो रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.