Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Konkan › आम आदमी पार्टी देणार महाराष्ट्राला नवीन पर्याय : ब्रि. सुधीर सावंत

आम आदमी पार्टी देणार महाराष्ट्राला नवीन पर्याय : ब्रि. सुधीर सावंत

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:21PMकणकवली : प्रतिनिधी

काँग्रेसची शेतकरी, कामगार विरोधी धोरणे मोदी सरकार अर्थात भाजप पुढे चालवत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांवर आता जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्यासाठी आपण आम आदमी पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. भय, भूक, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आम्हाला जनतेने साथ द्यावी ही आमची अपेक्षा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष सत्तेत येण्यासाठी आम्ही संघर्ष करू. दिल्लीप्रमाणे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भुईसपाट करून आम आदमीचे म्हणजे जनतेचे राज्य आणणार असल्याचा विश्‍वास माजी खासदार आणि आपचे नेते ब्रि. सुधीर सावंत यांनी व्यक्त केला. 

आपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 12 जानेवारीला जीजामातांच्या जन्मगावी म्हणजेच सिंधखेडराजा येथे आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपण आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आपला पूर्वीचा शिवराज्य पक्ष आपमध्ये सामील केला. नोव्हेंबर 2007 साली आपण आमदारकीचा राजीनामा देवून काँग्रेस पक्ष सोडला. कारण प्रचंड भ्रष्टाचार आणि शेतकरी, कामगार विरोधी धोरणांना आपण कंटाळला होतो. त्यानंतर कुठल्याही प्रमुख पक्षात आपण प्रवेश केला नव्हता. सर्वच पक्ष हे कष्टकर्‍यांच्या विरोधात काम करत आहेत. देशासमोरील ज्वलंत प्रश्‍न डावलून दंगलीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आपल्या कर्तव्यबुध्दीतून ही परिस्थिती बदलली पाहीजे याची जाणीव मला झाली. आज देश दिशाहीन अवस्थेत गटांगळ्या खात भरकटत आहे. संविधानाला काँग्रेस, राष्ट्रवादीने ठेचून काढले तर भाजप वेगाने हुकुमशाहीकडे जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मी दिल्लीत केजरीवाल सरकारचा अभ्यास केला. हे सरकार नवीन शाळा बांधत आहे तर महाराष्ट्रातील सरकार शाळा बंद करत आहे. भ्रष्टाचारविरोधात या शासनाची लढाई आहे.  या सरकारने आम आदमीसाठी मुलभूत काम केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला एक नवीन पर्याय देण्यासाठी आपण या पक्षात प्रवेश केला. अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. यापूर्वीही हा पक्ष महाराष्ट्रात होता, परंतु नेतृत्वहीन होता. आता मात्र आम्ही पक्षाची बांधणी करत आहोत. आतापर्यंत मुंबईसह 12 जिल्ह्यांचा दौरा करून झाला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत राज्य आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे सुधीर सावंत म्हणाले. 
सिंधुदुर्गात रविवारी बैठक झाली. नयना कुर्‍हाडे यांना जिल्हा संयोजक करावे, अशी शिफारस आली. सावंतवाडी मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून बबन शिरोडकर आणि दीनानाथ वेर्णेकर तर कणकवली मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून दिलीप भगत यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे सावंत म्हणाले.