कणकवली : प्रतिनिधी
आपण पोलिसांचा खबर्या असल्याची बतावणी करत, ‘तू मटका जुगारावर पैसे घेतोस अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, तुझ्यावर केस दाखल केली जाईल,’ अशी धमकी देत कणकवलीतील एका स्टॉलधारकाचे आणि स्टॉलचे मोबाईलवर फोटो काढत त्याच्याकडे साडेदहा हजारांची मागणी करत त्यापैकी साडेपाच हजार रु. उकळल्याच्या तक्रारीवरून इजाज दिलावर शेख (30, रा. कोल्हापूर) याला बुधवारी दुपारी कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून त्याने उकळलेले पैसे आणि त्याच्या ताब्यातील दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहा ते साडेसहाच्या सुमारास घडली. कणकवलीतील गांगोमंदिरनजीक दीपक शंकर बागवे (रा. कणकवली-टेंबवाडी) यांचा पान स्टॉल आहे. मंगळवारी सायंकाळी संशयित इजाज शेख हा त्या स्टॉलकडे गेला, काही वेळ सिगारेटचे झुरके मारले आणि स्टॉलधारक दीपक बागवे यांना, ‘मी पोलिसांचा खबर्या आहे, साहेब पुढे पुलाजवळ थांबले आहेत, तू मटका जुगारावर पैसे घेतोस अशी खबर आम्हाला मिळाली आहे, जर तुझ्यावर केस दाखल केली तर तुझे मोठे नुकसान होईल,’ अशी बतावणी करत त्याला तुला साहेबांना भेटवतो, असे सांगत दीपक बागवे यांना त्याच्या विनानंबरच्या अॅक्टिव्हा गाडीवर बसवले आणि जानवली पुलाजवळ कलेश्वर कॉर्नरनजीक तो थांबला. दीपकने साहेब कुठे आहेत, अशी विचारणा केली असता, साहेब जरा पुढे गेले आहेत, असे सांगत पुन्हा त्याचा मोबाईलवर फोटो घेतला. बघ, केस केली तर तुझेच नुकसान होईल, नाही तर साडेदहा हजार रु. दे, काही होणार नाही, अशी बतावणी त्याने केली. दीपक बागवे यांना हा संशयित खरोखरच पोलिसांचा खबर्या असल्याचे वाटल्याने त्याने साडेदहा हजार रू. शक्य नाहीत, परंतु साडेपाच हजार रू. देईन असे सांगितले. या संशयिताने त्यावर थोडासा विचार केल्याचे भासवत ठीक आहे, असे सांगून पैसे देण्यास सांगितले. त्यावेळी स्टॉलधारक दीपक बागवे यांनी आपल्या मेव्हण्यास ही गोष्ट सांगून त्याला पूलाजवळ पैसे आणण्यास सांगितले. ते पैसे संशयित इजाज शेख याने घेतले आणि पुन्हा दीपकला गाडीवर बसवत त्याच्या स्टॉलजवळ आणले आणि तो निघून गेला. दीपकने नंतर हा प्रकार आपल्या काही मित्रांना सांगितल्यानंतर दीपक याची कोणीतरी फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर रात्रीपर्यंत त्या संशयिताचा दीपक आणि त्याच्या मित्रांनी कणकवलीत शोध घेतला मात्र तो काही सापडला नाही.
बुधवारी सकाळी दीपक बागवे याने कणकवली पोलिसात याबाबतची तक्रार दिली. साधारणपणे 30 वर्षे वयाचा, दाढी असलेल्या संशयिताने पोलिसांचा खबर्या असल्याची बतावणी करून आपली फसवणूक केल्याची तक्रार त्याने दिली. त्यानंतर कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. ओटवणेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलिस नाईक प्रकाश गवस, दिलीप पाटील यांनी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत संशयिताचा शोध घेतला आणि कणकवलीतच संशयित इजाज शेख याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून त्याने उकळलेले साडेपाच हजार रू. रोख रक्कम आणि त्याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. इजाज शेख याच्याविरूध्द पोलिसांचा खबर्या असल्याची बतावणी करत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, इजाज शेख याच्याविरूध्द फसवणुकीचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत याचाही तपास पोलिस करणार आहेत. जर तो पोलिसांच्या हाती लागला नसता तर तो आणखी काही जणांना लुबाडणार होता. मात्र, वेळीच तो पोलिसांच्या हाती लागल्याने आणखी काही गुन्हे टळले. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. ओटवणेकर करीत आहेत.