Mon, Jun 17, 2019 14:17होमपेज › Konkan › रत्नागिरी : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:19PMरत्नागिरी ः प्रतिनिधी 

एसटीची धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वार अब्दुल सत्तार इब्राहिम फणसोपकर (75, रा. नवा कर्ला, रत्नागिरी) यांचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी 9 वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या गेटसमोर घडला.

या अपघाताबाबत  लांजा डेपोचे एसटीचालक महेंद्र विठोबा कामेरकर (42, रा. घाटिवळे संगमेश्‍वर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, गुरुवारी सकाळी कामेरकर एसटी (एमएच-07-सी-7212) मधून प्रवासी घेऊन लांजा ते रत्नागिरी असे येत होते.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर प्रवासी उतरवून बस शहर बसस्थानकात जात होती. त्याच दरम्यान अब्दुल फणसोफकर दुचाकी (एमएच-08- एडी-6984) वरून कर्ल्याच्या दिशेने जात होते. फणसोफकर यांच्या दुचाकीची धडक एसटीच्या डाव्या बाजूला बसून हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे फणसोपकर रस्त्यावर फेकले गेले. त्यांचे डोके रस्त्यावर आदळल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुपारी 12 वा. सुमारास त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 

अन्य अपघातात कामगाराचा मृत्यू

दरम्यान, बुधवारी झालेल्या अपघातात नाव निरंजन कवडूलाल सोनावणे (44, रा. जाम, मध्यप्रदेश) या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला असून त्याचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहेत. बुधवारी दुपारी ट्रक (एपी-31-टीडी-0258) मधून सिमेंटची पोती घेऊन चालक कामगार निरंजन सोनावणेसह खालगाव देवीचे कोंड उतारातून जात होता. यावेळी वळणावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळला. या अपघातात निरंजन सोनावणेचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ओटवणेकर करीत आहेत.