Fri, Apr 26, 2019 20:14होमपेज › Konkan › जिल्हा परिषद भरविणार ‘बांधावरची शाळा’

जिल्हा परिषद भरविणार ‘बांधावरची शाळा’

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:47PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मनात शेतकर्‍यांबद्दल आदर निर्माण व्हावा, शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचे महत्त्व कळावे, शेतीचे तंत्र, बी-बियाणे, शेतीची आधुनिक अवजारे, खते-कीटकनाशके यांचा परिचय व्हावा व शेतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 6 व 7 जुलै रोजी शाळकरी मुलांसाठी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1442 शाळांमधून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार असल्याची माहिती शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रितेश राऊळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात अजूनही खूप चांगल्या प्रकारे शेती केली जाते. मात्र, समाजात शेतीबद्दलची आवड हळूहळू कमी होत असून तरुण पिढी शेतीपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आताच्या पिढीला शेतीचे महत्व पटवून दिले जावे, यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदमधील विद्यार्थ्यांना ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबवून शेतीची महती समजावून सांगितली जाणार आहे.

1 ते 7 जुलै रोजी कृषी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कृषी सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे गट तयार करून नजीकच्या शेतमळ्यामध्ये त्यांना शेतीचे धडे शिकवले जाणार आहेत. 6 जुलै रोजी मुलांना शेतीबद्दलची माहिती दिली जाणार आहे. कोणत्या प्रकारची शेती केली जाते, त्यात कोणते बियाणे वापरले जाते, लावणी म्हणजे काय? ती कशी केली जाते? त्यापूर्वी काय करावे लागते? याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. नांगर, रुमणे, कवळी, जगाल आदी अवजारांची माहिती करून दिली जाणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून शाळकरी मुले या शेतकर्‍यांची मुलाखत घेणार आहेत.

गावात एखादे कृषी सेवा केंद्र असल्यास त्याला भेट देऊन त्याची माहिती घेतली जाणार आहे. परिसरातील रानभाज्यांची ओळख करून देऊन त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगून त्या रानभाज्या खाण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. 7 जुलै रोजी मुलांना शेतीचे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काही वेळेस शेतात काम करून घेतले जाणार आहे. शेतावर शेतकरी गीते म्हणून शेतकर्‍यास प्रेरित केले जाणार असून शेतकर्‍यांबद्दल आदर व्यक्‍त केला जाणार आहे. या उपक्रमाच्या अनुभवाच्या आधारे ‘बळीराजासाठी एक दिवस’ या विषयावर शाळास्तरावर निबंध स्पर्धा घेतली जाणार आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रितेश राऊळ यांनी केले आहे.