होमपेज › Konkan › जि. प. शाळेतील बायोमेट्रीक हजेरीचा बार फुसका!

जि. प. शाळेतील बायोमेट्रीक हजेरीचा बार फुसका!

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 9:05PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या बायोमेट्रीक हजेरीचा प्रकल्प अखेर फुसकाच ठरला आहे. यामध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अशा प्रकराच्या हजेरीला आधीच शिक्षक संघटनांचा असलेला विरोध यामुळे  अखेर हा उपक्रम  रद्द करावा लागला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी कोकणात रायगड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली होती. त्या नंतर कोकणातील अन्य जिल्ह्यांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, प्रायोगिक तत्वावरच फुसका ठरलेला हा उपक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि विशेषतः मराठी शाळेत विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी या उपक्रमाची अमंलबजावणी शासनाकडून करण्यात येणार होती. इंग्रजी शाळांना आलेले प्राधान्य त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि मराठी शाळांची झालेली स्थिती बदलण्यासाठी हा उपक्रम शासनाने प्रस्तावित केला होता. 

राज्याच्या सहाही विभागात  एका जिल्ह्यात  या उपक्रमाची अमंलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्यापैकी कोकणासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, शाळेत रोज हजेरी पटावर  हजेरी घेतली जात असताना बायमेट्रीक यंत्रणा अत्यंत खर्चिक आणि त्याची अंमलबाजवणीही अडचणीची ठरणार असल्याने अखेर कोकणातील हा कायक्रम रद्द करण्यात आला.  तसेच हा उपक्रम विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी असमर्थ आणि तकलादू असल्याने तो गुंडाळण्यात आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सुमारे महिनाभर राबविल्यानंतर कोकणातील या उपक्रमाची अंमलबजावणी अन्य जिल्ह्यात करण्यात येणार होती. मात्र, तेथेही शिक्षक संघटनांचा याला विरोध  असल्याने अखेर हा उपक्रम रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनांना सूचित करण्यात आले आहे.