Thu, Jul 18, 2019 04:26होमपेज › Konkan › जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके ऑनलाईन

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके ऑनलाईन

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 8:10PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

शासकीय कर्मचार्‍यांच्या नियुक्‍तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातून सेवानिवृत्तीनंतर येणार्‍या अडचणींवर मात करता येणे शक्य होणार आहे. त्याची अंमलबजावणी 20 जुलैपर्यंत करावयाची असून, त्याबाबतचे प्रशिक्षण गुरुवारी जिल्हा परिषदेत देण्यात आले.

ऑनलाईन कारभारामुळे कामे लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य होते. तसेच नोंदीही तत्काळ ठेवता येतात. सेवा पुस्तके प्रत्येक शासकीय कर्मचार्‍याच्या नोकरीतील आयुष्याचा लेखाजोखा ठेवणारे पुस्तक असते. सुट्ट्यांपासून ते अगदी पदोन्नतीपर्यंतची माहिती त्यात नमूद केलेली असते. ही सेवा पुस्तके जपून ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या खात्यांची असते. 

काहीवेळा सेवापुस्तक गहाळ झाल्याच्या घटना घडतात. त्यातून वादही निर्माण होतात. त्याचा परिणाम सेवानिवृत्तीनंतर त्या कर्मचार्‍याला होतो. सेवापुस्तकातील नोंदी पूर्ण केल्याशिवाय निवृत्तीवेतन किंवा अन्य लाभ मिळत नाहीत. नियमित कामात काही नोंद अपूर्ण राहिलेल्या असतात. त्याची माहिती भरावयाची राहिलेली असते. ती पूर्ण करण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. 

या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सेवापुस्तकेच ऑनलाईन केली जात आहेत. एका क्लिकवर ती माहिती कर्मचार्‍याला मिळू शकेल. सर्व्हर मंत्रालयाशी जोडलेला असल्याने जिल्हा बदलीने जाणार्‍यांनाही त्याचा फायदा होणार आहे.

सेवा पुस्तके ऑनलाईन भरताना शिक्षकांची कसरत

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची संख्या सुमारे पावणे आठ हजार आहे. त्या प्रत्येकाची सेवापुस्तके ऑनलाईन करताना बराच कालावधी लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांतील कर्मचार्‍यांपेक्षा शिक्षण विभागाला सेवापुस्तके ऑनलाईन भरण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे 20 जुलैपर्यंतचा कालावधी पुरेसा असणार नाही.