Sun, Mar 24, 2019 06:33होमपेज › Konkan › भरधाव बोलेरोच्या धडकेत युवक ठार

भरधाव बोलेरोच्या धडकेत युवक ठार

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:23PMखेड : प्रतिनिधी

केळणे (ता. खेड) येथील साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून हुंबरी येथे परत येत असताना गाडीसमोर अचानक बैल आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे  भरधाव वेगातील बोलेरो जीपने महामार्गावर लोटे येथे गाडीच्या प्रतीक्षेेतील एका पादचार्‍याला ठोकर देत वडापावची गाडी उडवली. ही बोलेरो नंतर स्वीट मार्टच्या दुकानात घुसली. या अपघातात मुकेश विठ्ठल कासेकर  (24, रा. कोतवली-भोई वाडी ता. खेड) यांचा मृत्यू झाला. 

या अपघातात बोलेरो गाडीतील 16 प्रवासी जखमी झाले आहेत. हा गंभीर अपघात मंगळवारी रात्री 10:30 च्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर पटवर्धन लोटे येथे झाला. मुकेश कासेकर हा मुंबईला जाण्यासाठी पटवर्धन लोटे या ठिकाणी बसची वाट पाहत होता. त्याच सुमारास हा अपघात झाला आणि त्याच्यावर काळाने झडप घातली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील हुंबरी-धनगरवाडी येथून काही लोक साखरपुड्यासाठी केळणे येथे गेले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण बोलेरो गाडीने (एम. एच. 08. ए.जी. 1667) खेडच्या दिशेने हुंबरी या आपल्या गावी जात होते.  गाडी वेगात असल्याने महामार्गालगत मुंबईला जाण्यासाठी उभा असणारा कासेकर याला जोरदार धडक बसली.