Sun, May 19, 2019 14:48
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › युवकाच्या मृत्युप्रकरणी चिपळूण नगराध्यक्षा, मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा

युवकाच्या मृत्युप्रकरणी चिपळूण नगराध्यक्षा, मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:42PMचिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण न. प. मालकीच्या जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यासह ठेकेदार, दोन प्रशिक्षक आणि सत्ताधार्‍यांविरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठेकेदारासह दोन प्रशिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रामतीर्थ तलावाजवळ असलेल्या जलतरण तलावात बुडून कपिल रघुनाथ सांबरेकर या 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आणि बहुजन समाजाने हा विषय लावून धरला. सोमवारी सायंकाळी कामथे रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली आणि जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. शिवसेना नगरसेवकांनीही ही मागणी लावून धरली. 

यामुळे कामथे रुग्णालयात जमाव झाला. रात्री उशिरा या युवकाच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. तरीही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर मंगळवारी न.प.च्यावतीने नगराध्यक्षा खेराडे व सत्ताधारी नगरसेवकांनी मृत युवकाच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत दिली. यानंतर मंगळवारी सायंकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. चोवीस तासांनी त्या मृतदेहावर सावर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी सावर्डे येथील गणपत भानू सावंत (62, सावर्डे बौद्धवाडी) यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. युवकाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी व निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी जलतरण तलावाचा ठेकेदार हेमंत घोसाळकर, प्रशिक्षक यश कोवळे आणि रूपेश नार्वेकर अशा तिघांना अटक केली आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मुख्याधिकार्‍यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. अटक न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बडेसाब नायकवडी करीत आहेत.