Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Konkan › चेन मार्केटिंगमध्ये फसलेले युवक नातेवाईकांच्या ताब्यात

चेन मार्केटिंगमध्ये फसलेले युवक नातेवाईकांच्या ताब्यात

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:45PMकणकवली: वार्ताहर

औरंगाबाद येथील एका कंपनीच्या चेन मार्केटिंगमध्ये फसवणूक झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 युवकांची स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका  करण्यात आली़ कंपनीच्या तावडीतून सोडविलेल्या त्या युवकांना सोमवारी कणकवलीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे स्वाभिमानचे कार्यकर्ते जगदीश चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांचा कणकवलीत स्वाभिमान पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद येथून निघालेले स्वाभिमानचे कार्यकर्ते व ते युवक सोमवारी सकाळी कणकवलीत दाखल झाले. युवकांना आणण्यासाठी पुढाकार घेतलेले जगदीश चव्हाण, अर्जुन तळगांवकर, स्वप्निल वायंगणकर, बंटी वायंगणकर, प्रल्हाद वायंगणकर, प्रशांत देसाई, कैलास आटक यांच्यासह पालक पंढरीनाथ वायंगणकर (सुकळवाड) यांचे कौतुक स्वाभिमान पक्षाच्यावतीने माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत,तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे, पं.स. सदस्य  मिलींद मेस्त्री,सुभाष  मालंडकर, संदीप मेस्त्री, शामा दळवी,आप्पा सावंत,अण्णा कोदे, सुनील साळसकर आदी उपस्थित होते.

मार्केटिंमध्ये फसलेल्या युवकांमध्ये अक्षय धुरी (माणगाव), राजेश सावंत (आकेरी), मंदार कवटकर (वेताळबांबर्डे), अशोक पाटील (वैभववाडी), वसंत सावंत (कुडाळ), संदेश बेळेकर (शिराळे), नितीन चव्हाण (सावंतवाडी), रूपेश घामणे (शिराळे), नवदुत दळवी (कणकवली), बापू सावंत (कणकवली), कौस्तुभ भवर (कुडाळ), प्रवीण राणे (कट्टा), संकेत वायंगणकर (सुकळवाड), महादेव राऊळ (सुकळवाड), अक्षय पास्ते (दोडामार्ग), प्रथमेश गवस (दोडामार्ग), नितीन वरवडेकर (कणकवली), सचिन धुरी (सावंतवाडी), शैलेश सावंत (सावंतवाडी), नीतेश कोरकर (दोडामार्ग), तुकाराम गावडे (आंबोली), लक्ष्मण नेणम (वेंगुर्ले), कृष्णा सडविलकर (वेंगुर्ले) आदींचा समावेश आहे़  या युवकांना कणकवलीत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़

सर्वसामान्य कुटुंबातील असलेले हे युवक गेले आठ ते नऊ महिने औरंगाबाद येथे होते. कंपनीकडून नोकरीचे आमिष दाखवून या युवकांना नेण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित कंपनीकडून प्रत्येक युवकाकडून 15 हजार रूपये भरून घेत त्यांना विविध प्रोडक्ट विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूूक करण्याचे काम  देण्यात आले होते़   कंपनीच्या खोट्या आश्‍वासनांना बळी पडून आपली फसवणूक झाल्याचे या युवकांनी सांगितले.

औरंगाबाद येथे अडकलेल्या या युवकांची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आ.नीतेश राणे यांना दिली होती. आ.राणे यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्गातील काही स्वाभिमानचे कार्यकर्ते औरंगाबाद येथे पोहोचले. तेथील पदाधिकार्‍यांच्या सहकार्यातून त्या युवकांची सुटका करत मिशन फत्ते करण्यात आले.  रविवारी रात्री मुंबईत पोहोचलेल्या या युवकांनी आ.नीतेश राणे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.