Mon, Jan 27, 2020 11:27होमपेज › Konkan › 'हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा' (video)

'हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा' (video)

Published On: Jul 09 2019 3:36PM | Last Updated: Jul 09 2019 4:08PM
कुडाळ : प्रतिनिधी

कालच मला निरोप मिळाला की, जे कणकवलीत घडलं ते सावंतवाडीत सुध्दा घडू शकत. खरं तर मी जनतेच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. ज्यांची हिंम्मत असेल त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करून दाखवावेत, असे खुले आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांचे नाव न घेता शिवसेना नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी दिले. पालकमंत्र्यांनी आपले मंत्री पद जनतेच्या प्रश्‍नांसाठी न वापरता केवळ एन्जॉय करण्यासाठीच उपभोगले असल्याची टिका करून श्री. साळगांवकर यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे. 

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या दयनीय अवस्थेमुळे कणकवलीत झालेल्या चिखलफेकीच्या आंदोलनानंतर महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जावून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री केसरकर यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकत्रितरीत्या आवाज उठविण्यासाठी कुडाळ येथील मराठा हॉल येथे राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आ. परशुराम उपरकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, काँग्रेस प्रवक्ता काका कुडाळकर, मनसे जिल्हाप्रमुख धिरज परब, राष्ट्रवादी अध्यक्ष भास्कर परब,काँग्रेस अध्यक्ष विजय प्रभु आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. साळगांवकर म्हणाले की, अनेकांना प्रश्‍न पडला असेल की, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर हे पालकमंत्र्यांच्या जवळचे आहेत. होय, हे मी मान्य करतो, गेली 20 वर्ष मी त्यांच्या सोबत आहे. अनंत अडचणींवर मात करत त्यांना आमदार म्हणून निवडून आणल. आमदार झाल्यानंतर त्यांच्यात बदल घडू लागले. एकदा आमदार झाल्यावर ते समाधानी होतील असं वाटत होतं, पण ते समाधानी झाले नाहीत, त्यानंतर ते मंत्री झाले. पण त्यांच्यात अधिकच बदल झाला. त्यांनी जनतेला वार्‍यावर सोडलं. आतातर ते जनतेचा आवाज दडपण्यासाठी हुकूमशाही मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून चांगल काम करण्याची अपेक्षा हेाती पण आमचा भ्रमनिरास झाला असल्याचे यावेळी सांगितले.

16 जुलैला कुडाळात जेलभरो

कणकवलीतील चिखलफेक आंदोलनानंतर शासनकर्ते म्हणून महसुलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी आदोंलन दडपण्यासाठी जी भुमिका घेतली तसेच पालकमंत्री दिपक केसरकर यांनी या घटनेकडे गांर्भियाने न पाहिल्याने याचा निषेध म्हणून मंगळवार दि. 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ पोलिस स्थानकात सर्वपक्षीय जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने अमित सामंत व काका कुडाळकर यांनी दिला.