Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प हद्दपार करण्याचा ठराव

नाणार प्रकल्प हद्दपार करण्याचा ठराव

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 9:10PM

बुकमार्क करा
येळवण : वार्ताहर

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हद्दपार करण्याचा ठराव कोकण विकास आघाडीच्या मुंबईतील अधिवेशनात करण्यात आला.  कोकण विकास आघाडीचे 39 वे वार्षिक अधिवेशन विक्रोळी येथील  अस्मिता कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनाला संपूर्ण कोकण विभागातून सुमारे 500 कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वागताध्यक्षपदी मुंबई विक्रोळी येथील ओम अलंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर यांनी भूषविले. या  अधिवेशनात कोकणच्या विकासांवर चर्चा करुन अनेक ठराव पारित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राजापूर रिफायनरी प्रकल्पाला सर्वच कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. या ठरावावर बोलताना मोहन केळुसकर म्हणाले की, नाणार प्रकल्पामुळे परिसरातील चौदा गावे व देवगड तालुक्यातील चार गावे अशा अठरा गावांतील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. परिसरातील आंबा, काजूण, नारळ व सुपारीच्या बागा जळून खाक होणार आहेत.

कोकणातील जनतेच्या जीवनाची राखरांगोळी होणार असल्याने हा प्रकल्पाचा राजापूरमधून हद्दपार करावा, अशी मागणी केळुसकर यांनी केली व तसा ठरावही सर्वानुमते करण्यात आला.  शासनाने आघाडीच्या या ठरावाचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा कोकण विकास आघाडीला संघर्ष करावा लागेल, अशा इशाराही केळुसकर यांनी या अधिवेशनात ठरावावर बोलताना केला.  राजापुरातील नाणार प्रकल्पासंदर्भातील ठरावासह कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तातडीने करण्यात यावे, पश्‍चिम किनारी सागरी महामार्गाचे काम पुलासह पूर्ण करावे, महाराष्ट्राची विकासवाहिनी असलेल्या एसटीचे खासगीकरण करण्यात येऊ नये, या पूर्वी सुरु असलेली बोट वाहतूक पूर्ववत सुरु करावी, कोकणातील शेतकर्‍यांना आंबा, काजू, नारळ, कोकम व सुपारी या उत्पादनाला राज्यकर्त्यांनी हमीभाव ठरवून द्यावेत, असे कोकणच्या विकासासंबंधी ठरावही या वेळी पारित करण्यात आले. या ठरावावरील चर्चेत प्रकाश तावडे, सूर्यकांत पावसकर, रमाकांत जाधव, मनोहर डोंगरे, चंद्रकांत आंबे्र, गणपत चव्हाण, विकास गांगण, सुरेश गुडेकर व नरेंद्र म्हात्रे यांनी सहभाग घेतला.