Thu, Jul 16, 2020 08:12होमपेज › Konkan › महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटतेय : राज ठाकरे

महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटतेय : राज ठाकरे

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:26PMचिपळूण : खास प्रतिनिधी

आपल्याला महाराष्ट्राची चिंता वाटत आहे. पालघरमधील भय्यांच्या मतांसाठी येथील मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ आणावा लागतो. ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्यामुळे खूप चिंता वाटते. सध्या सर्वत्र खेळखंडोबा सुरू आहे, अशी भीती चिपळूण दौर्‍यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.

शहरातील माधव सभागृहात शनिवारी सकाळी 11 वा. पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, या देशात खोटे बोलून एका माणसामुळे गोंधळ झाला आहे. देशाचे भवितव्य ठरविणारे अमित शाहा कोण? त्यामुळे आता या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असा विचार आपण प्रथम दिला. भाजप येत्या लोकसभा निवडणुकीत शंभर जागा गमावेल, असा अहवाल आला आहे. त्यामुळे हे जिंकण्यासाठी वाट्टेल ते करतील, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्राविषयी ते म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास आराखडा सर्वप्रथम आपण मांडला. एकाही राजकीय पक्षाने असा आराखडा देण्याचे धाडस केले नाही. मात्र, तो कुणी वाचला का? असा सवाल त्यांनी केला. जर राज्याचे मुख्यमंत्री नुसते विदर्भाकडे बघत असतील तर महाराष्ट्र तसाच राहणार. विदर्भाकडे बघून महाराष्ट्राचे थोडेच भले होणार? ज्या भागातून मुख्यमंत्री येतो तो सर्व आपल्याकडेच नेणार असेल तर कसे चालेल? या अशा नेत्यांच्या तोकड्या स्वभावामुळे राज्याचे नुकसान होत आहे. 

एक संपूर्ण राज्य म्हणून पाहणे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावले. कोकणात होऊ घातलेले मत्स्य विद्यापीठ नागपूरला नेण्याचा काय संबंध? किनारपट्टी इकडे आणि मत्स्य विद्यापीठ नागपूरला. मग या किनारपट्टीचा काय फायदा? मत्स्य विद्यापीठ करायची असतील तर दोन करा. मात्र, कोकणचे विद्यापीठ नागपूरला नको. सत्तेवर आल्यानंतर समृद्धी मार्गही विदर्भात. यातून यांचे विचार बघा. मुख्यमंत्री व्हायचे आणि हेच लोक पाठीमागून विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे, अशी मागणी करतात. ही सत्ताधार्‍यांची मानसिकता बघा. मग राज्याचे दुसरे काय होणार? त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची चिंता वाटते. 

भाजप सरकारने ‘स्टार्ट अप’सारख्या घोषणा दिल्या. त्यासाठी नवनवे शब्द शोधले. मात्र, या घोषणा फसल्या. ते मान्य करा. नुसत्या घोषणांनी उद्योग येतात का? त्यासाठी पोषक वातावरण तयार करायला हवे. राज्यकर्त्यांना कोकणसाठी काय हवे ते कळायला हवे. येथील फलोत्पादन, मत्स्य, पर्यटन उद्योगाला चालना मिळायला हवी. मात्र, राज्य हातात आल्याशिवाय आपण काय करू शकणार, असा उलट सवाल केला. 

सर्वजण ईव्हीएम मशिनबाबत शंका घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी या मशिनबाबत पुरावा देणारे आणि सातत्याने बोलणारे किरीट सोमय्या आज गप्प का, असा सवाल त्यांनी केला आणि मीडियाने वस्तुस्थिती लिहिली पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.