Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Konkan › ओसरगाव येथे डंपरखाली चिरडून एक कामगार ठार ; दोघे गंभीर

ओसरगाव येथे डंपरखाली चिरडून एक कामगार ठार ; दोघे गंभीर

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:30PMकणकवली : प्रतिनिधी

असरोंडी येथील चिरेखाणीवरून चिरे घेवून ओसरगाव-गावठणवाडी येथे चिरे उतरण्यासाठी जात असताना ओसरगाव-गावठणवाडी येथे एका चढावावर चिरे भरलेला डंपर न्यूट्रल होवून मागे येत पलटी झाला. त्यावेळी ट्रकच्या हौद्यात चार कामगार होते. त्यातील एक कामगार ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले.  हा अपघात सोमवारी सायंकाळी 7.30 वा.च्या सुमारास घडला.

ही घटना समजताच आजुबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेवून जखमी कामगारांना तातडीने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात हलविले. तर जेसीबीच्या सहाय्याने डंपर बाजूला करून चिरडलेल्या कामगाराला बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, त्या कामगाराचे नाव समजू शकले नाही. ओसरगावचे सामाजिक कार्यकर्ते बबली राणे व ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या अपघातचे वृत्त समजताच कणकवली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. 

या अपघातात शंकर सखाराम गोवेकर (30), सुभाष दाजी खरात (30, दोघेही रा. कणकवली) हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.